औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील जरंडी येथील प्राथमिक शाळेत सतत ४ महिन्यांपासून २१ विद्यार्थिनींशी अश्लील संवाद साधून छळ करणाऱ्या मुख्याध्यापकाविरुद्ध अखेर पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.हरिदास काटोले (४२, रा. सोयगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, जरंडी येथील केंद्रीय प्राथमिक जि.प. शाळेचा मुख्याध्यापक हरिदास काटोले जवळपास चार महिन्यांपासून शाळेतील २१ विद्यार्थिनींशी अश्लील संवाद करून त्यांचा लैंगिक छळ करीत असल्याची तक्रार ५ फेब्रुवारी रोजी येथील मुलींनी पालकांकडे केली होती. यानंतर पालकांनी शाळेत धाव घेऊन जाब विचारला होता, तसेच येथे भेट देणारे गटविकास अधिकारी एम. सी. राठोड, गटशिक्षणाधिकारी विजय दुतोंडे यांना घेराव घालून कारवाईची मागणी केली होती.दरम्यान, बिडीओ व गटशिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त चौकशी अहवालावरून बुधवारी या मुख्याध्यापकाला जि.प. सीईओ पवनीत कौर यांनी निलंबित केले होते. मात्र, याबाबत पोलीस ठाण्यात दाखल तक्रार मागे घेण्यात आली होती.मात्र, पालकांनी ही तक्रार माघार घेण्याची कारणे शोधण्यासाठी शनिवारी जिल्हा बालहक्क कल्याण समितीने जरंडी गाठून विद्यार्थिनींशी थेट चर्चा करून या प्रकरणात जिल्हा बालकल्याण समितीने गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई पार पडली, अशी माहिती जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड. ज्योती पत्की यांनी दिली.बालकल्याण समिती सदस्यांची जरंडी शाळेला भेट-दरम्यान, जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड. ज्योती पत्की, अॅड. अनिता शिवूरकर, प्रा.अश्विनी लखमले, पोलीस निरीक्षक शेख शकील आदींनी जरंडी शाळेला भेट देऊन विद्यार्थिनींशी संपर्क साधला. चौकशीअंती अखेर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली.या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक शेख शकील, उपनिरीक्षक गणेश जागडे, महिला पोलीस वैशाली सोनवणे, कविता मिस्तरी, सागर गायकवाड आदी करीत आहेत.
अखेर त्या मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:35 AM