औरंगाबाद : जयभवानीनगर येथील नाल्यातील अतिक्रमणांचा मुद्या महापालिकेत मागील एक वर्षापासून गाजत आहे. कालपर्यंत महापालिकेने या विषयात अंग काढून घेण्याचीच भूमिका घेतली होती. शेवटी दबावानंतर प्रशासनाने बुधवारी सकाळी कारवाईचा बडगा उगारला.
प्रारंभी या भागातील नागरिकांनी अतिक्रमणे वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र यश मिळत नसल्याचे पाहून त्यांनीही माघार घेतली. दिवसभरात मनपाच्या पथकाने नाल्यातील चार इमारती जमीनदोस्त केल्या. या भागातील १३८ इमारती पाडण्यात येणार आहेत. मनपाच्या प्रत्येक सभेत नगरसेविका मनीषा मुंडे अतिक्रमणांचा मुद्या लावून धरीत असत. त्याला भाजपचे नगरसेवकही साथ देत असत. सप्टेंबर महिन्यात ढगफुटीनंतर जयभवानीनगर परिसर जलमय झाला. नाल्यांमधील प्रचंड अतिक्रमणांमुळे घरांमध्ये पाणी शिरले होते. जिकडे तिकडे हाहाकार उडाला होता. त्यानंतर पालकमंत्री, जिल्हाधिका-यांनी पाहणी केली व नाल्यावर असलेली १३८ अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले होते.
मनपाने अगोदर पावसाळा व नंतर दसरा, दिवाळीचा सण असल्यामुळे कारवाई पुढे ढकलली होती. बुधवारी सकाळी पदनिर्देशित अधिकारी सी. एम. अभंग यांच्यासह प्रभाकर पाठक, इमारत निरीक्षक गंगाधर भांगे, पोपटराव तिवटने यांचे पथक जयभवानीनगरातील जिजामाता कॉलनी भागात पोहोचले. पोलीस, जेसीबीसह दाखल झालेले पथक पाहून नागरिकांमध्ये खळबळ उडाली. नागरिकांनी यावेळी कडाडून विरोध केला. दुपारनंतर प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात करण्यात आली. सायंकाळपर्यंत चार अतिक्रमणे हटविण्यात आल्याचे मनपा अधिका-यांनी सांगितले.
पोलिसाचे अतिक्रमणजिजामाता कॉलनीच्या पुढे सिडकोची घरे असून, सिडकोने नाल्याला संरक्षक भिंत बांधली आहे. या संरक्षक भिंतीवरच एका पोलीस उपनिरीक्षकाने भिंत बांधून अतिक्रमण केले होते. मनपाच्या पथकाने हे अतिक्रमण जमीनदोस्त केले. तसेच नाल्यावर बांधण्यात आलेले एक घर व इतर बाधित अतिक्रमणे हटविण्यात आल्याचे सी. एम. अभंग यांनी सांगितले.