औरंगाबाद : संविधान नष्ट करण्याचा डाव केंद्र शासनाने आखला आहे. संविधान नसेल तर देश राहणार नाही, हुकूमशाही सुरू होईल. देश वाचविण्यासाठी अल्पसंख्याक समाज आज रस्त्यावर उतरला आहे. जोपर्यंत केंद्र शासन जुलमी कायदे मागे घेणार नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार आज व्यक्त करण्यात आला. जुलमी राजवटीने ‘मुल्क का बच्चा बच्चा जाग चुका है’ आणखी अन्याय सहन करणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही महिलांनी दिला.
सीएए, एनपीआर, एनआरसी विरोधात आज महिलांतर्फे दिल्लीगेट येथे मुस्लिम नुमार्इंदा कौन्सिलतर्फे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या इतिहासात प्रथमच मुस्लिम महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्या. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. व्यासपीठावर पुण्याहून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे, जयश्री शिर्के, इशरत हाश्मी, शबाना आयमी, खैमुन्निसा बेगम, वसुधा कल्याणकर, प्रा. मोनिसा बुशरा यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना सुक्षमा अंधारे यांनी नमूद केले की, संविधानात इंडिया असे देशाला संबोधित केले आहे. मुस्लिम बांधवांनी यापुढे हिंदुस्तान असा शब्दप्रयोग अजिबात करू नये. संविधानाने एका धर्मनिरपेक्ष देशाची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा देशाला हिंदुराष्टÑ बनविण्याचे स्वप्न पाहत आहेत. तडीपार, गोध्रा प्रकरणात ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये. त्यांच्याकडून सुरू असलेला अन्याय, अत्याचार सहन करू नका. बहुमताच्या बळावर ते काहीही करू इच्छित आहेत; पण असे काहीही होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शबाना आयमी यांनी नमूद केले की, अल्पसंख्याक समाजावर जेवढा अन्याय कराल तेवढ्याच ताकदीने हा समाज उभा राहील. फिरौन हा राजाही नेस्तनाबूद झाला. नवीन राष्टÑ घडविण्याची वेळ आल्याचेही त्यांनी सांगितले. खैमुन्निसा बेगम यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन करताना सांगितले की, मुस्लिम बांधव, महिला देशाला वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. शाहिनबाग, जेएनयूच्या आंदोलनाला सलाम केला पाहिजे. देशाला गुलामीकडे नेणाऱ्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत. या देशातील नागरिकांना आपले नागरिकत्व सिद्ध करण्यास केंद्र शासन सांगत आहे. हा देशातील १३० कोटी जनतेचा अपमान आहे. जोपर्यंत केंद्र शासन जुलमी कायदे मागे घेणार नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. आपले अपयश झाकण्यासाठी केंद्र शासन वादग्रस्त निर्णय घेत आहे.
हम भी देखेंगे...वसुधा कल्याणकर यांनी फैज अहेमद फैज यांची लोकप्रिय कविता सादर केली. या कवितेच्या प्रत्येक ओळीवर उपस्थित हजारो महिलांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. ‘हम भी देखेंगे’ही कविता त्यांनी सादर केली.