औरंगाबाद : जाधववाडीत बाजार समितीत दररोज ९० ते १०० टन कांद्याची आवक होत आहे. होलसेलमध्ये ७ ते ११ रुपये किलोने विकला जाणार कांद्या, भाजी मंडई व हातगाडीवर मात्र २० ते ३५ रुपये किलोपर्यंत विकला जात आहे.
एकीकडे कांदा उत्पादकांना मातीमोल भावात कांदा विकावा लागतो आणि दुसरीकडे ग्राहकांना चढ्या दराने कांदा खरेदी करावा लागत आहे. मधला नफा व्यापारी व विक्रेत्यांच्या साखळीत जात आहे.
सध्या शहरात हलक्या प्रतीचा कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. नंबरवन क्वाॅलिटीचा कांदा दिसत नाही. हलक्या प्रतीचा कांद्यावर एकच पात असते. ही पात वाहतुकीमध्येच निघून जाते. हा कांदा लवकर खराब होतो.
मागील महिन्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला याचा परिणामही कांदा उत्पादनावर झाला. यामुळे हलक्या प्रतीचा कांदा जास्त प्रमाणात विक्रीला येत आहे. यातील चांगला कांदा बाजूला करून तेच जास्त भावात विकल्या जात आहे. कांदाच्या पोत्यामागे १ ते ३ किलोपर्यंत कांदे लगेच खराब होतात. यामुळे ती नुकसानभरपाई अन्य कांद्याची किंमत वाढवून केली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सध्या बाजर समितीमध्ये फुलंब्री, लासूर, देवगाव रंगारी या भागातून कांदा येत आहे.
चौकट
चांगल्या कांद्याची साठवणूक
बाजारात कांद्याला भाव नसल्यामुळे डबल पत्ती नसलेला नंबरवन क्वॉलिटीचा कांदा शेतकरी बाजारात आणत नाही. भाव कमी असल्याने साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे. कारण हा कांदा जास्त दिवस टिकतो. चांगला भाव मिळल्यावरच शेतकरी हा कांदा विक्रीला काढतील.
चौकट
नाफेडने ३० रुपये किलोने कांदा खरेदी करावा
आता नाफेडद्वारा राज्यातील कांदा खरेदी सुरू होणार आहे. नाफेडने शेतकऱ्यांकडील कांदा ३० रुपयांनी खरेदी करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केली आहे.
चौकट
फेकून दिलेला कांदा गरीब घेतात वेचून
जाधववाडी अडत बाजारात खराब कांदा फेकून दिला जात आहे. तो कांदा खाणाराही गरीब आहे. त्या फेकून दिलेल्या कांद्यातून थोडा चांगला कांदा निवडून ते लोक घरी खाण्यासाठी नेतात. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या कांद्याची साठवणूक करणे सुरू केले आहे. शहरात सध्या हलक्या प्रतीचा कांदा तोही महागड्या दरात ग्राहकांना खरेदी करावा लागत आहे.