सिल्लोड: देशातील डोंगर दऱ्यात ग्रामीण भागातील वाडीवस्तीत राहणाऱ्या गोरगरीब अल्पसंख्याकांसह दुर्बल आणि गरजू घटकांच्या समृद्धीसाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे. त्यांना शासनाच्या विविध योजनेचा फायदा दिला जाईल. काँग्रेसने ६० वर्षात जनतेला गरीब केले आहे. मात्र आम्ही अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवित आहोत. २०४७ पर्यंत देश पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विकसीत भारत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री किरेन रिजिजू यांनी केले. तसेच महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन निर्माण केले जातील, असे आश्वासन देखील मंत्री रिजिजू यांनी दिले.
सिल्लोड येथे मंगळवारी दुपारी ११ वाजता शहरातील प्रियदर्शनी चौकात राज्यातील पहिले अल्पसंख्याक मुलां - मुलींसाठी ३६ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
सिल्लोड तालुक्यात २५ हजार कोटींची विकास कामे सुरू आहे. सिल्लोड शहरात अल्पसंख्याक समाजाच्या २५० मुलं व २५० मुली अशा ५०० विद्यार्थ्यांना राहण्यासाठी प्रशस्त वसतिगृह केले जाणार आहे. अल्पसंख्याक समाजातील वाडी वस्तीत पायाभूत सुविधा दिल्या जातील,अल्पसंख्याक समाजाच्या शाळांचा निधी २ लाखावरून १० लाख करण्यात आला आहे सिल्लोड येथे उर्दू घर केले जाईल प्रशस्त वाचनालय इंटरनेट यामुळे ऑनलाइन विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल व त्यांची शिक्षणात प्रगती होईल अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक बचत गटाला २ लाखांचे कर्ज दिले जाईल, अशी घोषणा यावेळी अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.
यावेळी राज्याच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागल, उपसचिव श्याम वर्मा, उपसचिव मोईन ताशीलदार, औकाफ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद बशीर सय्यद, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी सय्यद रफिक कंकर यांनी केले, देवेंद्र सूर्यवंशी यांनी सुत्रसंचालन तर शेवटी माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आभार मानले.
यावेळी माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, रामदास पालोदकर, नंदकिशोर सहारे, अजीजसेट बागवान, श्रीरंग पा साळवे, रउफ बागवान, देविदास लोखंडे, मारुती वराडे, मनोज झंवर, विनोद मंडलेचा, सुदर्शन अग्रवाल, सय्यद नासेर, इम्रान ( गुड्डू ) ,नजीर अहेमद, सय्यद कैसर, आसिफ बागवान, राजू मिया देशमुख, सत्तार हुसेन, मतीन देशमुख, सलीम हुसेन, चेअरमन अब्दुल करीम, अजगर झारेकर, अनिस पठाण हजर होते.