फुलंब्री : येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ते पाल येथे उभारण्यात आलेल्या स्टेडियमच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
फुलंब्रीचा बंद पडलेला देवगिरी साखर कारखाना सुरू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे केली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कारखाना सुरू करण्यासंदर्भात शासनाकडून पूर्णपणे मदत केली जाईल. मात्र, हा साखर कारखाना बाहेरील व्यक्तीने चालविण्यापेक्षा स्थानिक लोकांनीच चालविला पाहिजे, त्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
पाल येथील संदीप जाधव या तरुणाने स्वखर्चाने पावणेचार एकरांत स्टेडियम उभारले. या स्टेडियमचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी कार्यक्रमात त्यांनी प्रथम गणेश जयंती व संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.
या कार्यक्रमाला पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे, बाळासाहेब थोरात, नितीन देशमुख, अभिजित देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राहुल डकले, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, सभापती चंद्रकांत जाधव, छाया जंगले, सरपंच जया जाधव, उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव, चंद्रशेखर जाधव, शेख हमीद, अजहर पटेल, मतीन पटेल यांची उपस्थिती होती.
-------
पोशिंदा जगला तरच देश जगेल ही भूमिका घ्यावी
केंद्र सरकारने लादलेले तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी ९० दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करीत आहेत; पण केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. पोशिंदा जगला तरच देश जगेल, हा विचार केंद्र सरकारच्या लक्षात का येत नाही. तसा विचार करून निर्णय मागे घेतले गेले पाहिजेत, असे मत अजित पवार यांनी कृषी कायद्यांबाबत मांडले.
-----
कोरोना संपला नाही, मास्क लावा
असे कसे चालणार बाबांनो
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातलेले असताना शासनाच्या वतीने नागरिकांकरिता नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे; पण या नियमाची पायमल्ली होताना दिसून येते. मी औरंगाबादहून कारने फुलंब्रीला आलो; पण मोजक्याच लोकांच्या तोंडाला मास्क लावलेले दिसले. या कार्यक्रमातही अनेकांनी मास्क लावलेला नाही. असे कसे चालणार आहे, असे म्हणून उपस्थित लोकांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कानउघाडणी केली. कोरोनाचे संकट अद्यापही संपलेले नाही. स्वत:बरोबर इतरांचीही काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
फोटो :