छत्रपती संभाजीनगर : शहरात पत्ता शाेधताना नवीन व्यक्तींना बराच त्रास होतो. प्रत्येक मालमत्ताधारकाच्या घरावर एकाच पद्धतीचे डिजिटल ॲड्रेस असायला हवे. त्यासाठी काय करता येईल, याचा विचार महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. या उपक्रमासाठी लागणारा खर्च नागरिकांकडून वसूल केला जाणार नाही, महापालिका स्वत:सुद्धा निधी वापरणार नाही. सीएसआर अथवा शासनाकडून निधी मिळवून उपक्रम राबविण्याचा मानस प्रशासक जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला.
स्मार्ट सिटीने मागील वर्षी जीआयएस पद्धतीने मॅपिंग केले. शहरात २ लाख ८० हजार मालमत्ता दिसून येतात. ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले तरी आकडा तेवढाच येतो. सर्वेक्षणात इमारती दिसत असल्या तरी मालमत्ताधारकांची संख्या यापेक्षा अधिक असू शकते. मनपाने व्यावसायिक, घरगुती अशा २ लाख ७५ हजार मालमत्तांना कर लावलेला आहे. ऐतिहासिक आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या शहरात दरवर्षी ३० लाखांहून अधिक देशी-विदेशी पर्यटक येतात. यातील बहुतांश पर्यटक शहरही फिरतात. बाजारात खरेदीसाठी येतात.
बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना पत्ता विचारत फिरावे लागते. औरंगपुरा, पिंपळाचे झाड, एखाद्या दुकानाच्या मागील गल्लीत असा पत्ता सांगावा लागतो. प्रत्येक मालमत्तेवर एक डिजिटल ॲड्रेस असेल तर शोध घेणाऱ्याचे काम सोपे होऊ शकते. देशातील मोठ्या शहरांमध्ये आता ही पद्धत वापरण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातही डिजिटल ॲड्रेस पद्धत राबविण्याचा मानस प्रशासक जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी नागरिकांवर कोणताही अतिरिक्त खर्च पडणार नाही. महापालिकेलाही निधी खर्च करण्याची गरज पडणार नाही. सीएसआर किंवा अन्य माध्यमातून, शासन निधीतून हा उपक्रम राबविणे शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. या पद्धतीमध्ये गुगल मॅपप्रमाणे व्यक्ती थेट संबंधित पत्त्यावर जाऊन उभा राहू शकतो.
काय असेल डिजिटल ॲड्रेसमध्येजगभरात डिजिटल ॲड्रेसचा वापर वाढतो आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये याचा वापर सुरू आहे. ड्रोनद्वारे अचूक पत्त्यावर सामान पाठविण्यात येते. भारतात इंदूर शहराने अलीकडेच डिजिटल ॲड्रेसकडे वाटचाल सुरू केली. यामध्ये घर क्रमांक, मालमत्ता क्रमांक, नळ कनेक्शनची माहिती, सिटी सर्व्हे क्रमांक, गट क्रमांक, जीपीएस लोकेशन, मालमत्ताधारकाचे नाव आदी माहिती टाकली जाते. क्युआर कोडच्या माध्यमाने मालमत्ता शोधणे अधिक सोपे जाते.
याचे नेमके फायदे काय?एखाद्या व्यक्तीने तुमचा पत्ता मागितला तर त्याला सविस्तर सांगत बसायची अजिबात गरज राहणार नाही. एक कोड शेअर केला तर समोरचा व्यक्ती क्युआर कोड स्कॅन करून थेट तुमच्या घरासमोर हजर राहील. एखाद्या दुकानातून सामान, खाद्यपदार्थ मागविले तर डिलिव्हरी बॉयला पत्ता शोधायला सोपे जाईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा हा फायदाच म्हणावा लागेल.