आयुष्य आनंदात, सुखाने आणि समाधानाने जगावं असे प्रत्येक व्यक्तीला वाटतं असत. त्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्नशील असतो. जगातील सर्व सुख, आनंद आपल्यालाच मिळावे. यासाठी तो अथक परिश्रम घेतो. हे सर्व सत्य असले तरी त्याला एक प्रश्न नेहमी सतवत असतो. तो म्हणजे, “ आयुष्य म्हणजे नेमके काय ? ” जन्म आणि मृत्यू यांमधील काळ म्हणजे आयुष्य का ? असा ही प्रश्न त्याला सतत पडत असतो. खरंच आयुष्य म्हणजे काय ? व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यू पर्यंतचा वाढत गेलेला कालावधी की कमी होत गेलेला एक- एक क्षण म्हणजे आयुष्य ? खरे तर आयुष्य म्हणजे व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अनुभवाची शिदोरी. व्यक्ती मध्ये असणारे राग, लोभ, मद, मोह, मत्सर या गुणांची गोळा बेरीज म्हणजे आयुष्य होय. या गुणांचा व्यक्तीच्या जीवनावर होणारा परिणाम म्हणजे आयुष्य. या गुणांमुळे व्यक्तीला खूप काही प्राप्त होते. परंतू त्यापेक्षा जास्त गोष्टी तो गमावून बसतो. या प्राप्त-अप्राप्त कालावधीतील त्याला मिळालेले अनमोल अनुभव म्हणजे आयुष्य नव्हे का ?
व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या या तमो गुणांमुळे त्याला अनेक गोष्टी शिकायला भेटतात. आपल्यात असणाऱ्या या गुणांमुळे आपण कुठे आहोत ? काय आहोत ? याचा व्यक्ती शोध घेऊ लागते. स्वतःचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी व्यक्ती पुन्हा धडपड करू लागते. अशा कालावधी मध्ये व्यक्ती मागे झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न करतो. राग, लोभ, मद, मोह, मत्सर याचा परिणाम त्याच्या लक्षात येतो. तो स्वतःमध्ये बदल करतो. हे बदल म्हणजेच आयुष्य नव्हे का ? व्यक्तीला हवे असणारे प्रेम, आनंद, समाधान हे या गुणांमुळे मिळत नाही हे त्याच्या लक्षात येते. स्वप्नांसाठी धावत असतांना स्वाभिमान, गर्व व हे सर्व तमो गुण यांना सोबत घेऊन क्षणिक आनंद मिळाला. परंतू समाधान कोसो दूर राहिले हे व्यक्तीच्या लक्षात येते.
व्यक्तीचा आनंद मिळवण्यासाठी राग, लोभ, मद, मोह, मत्सर यांच्या सोबतीने केलेला प्रवास व या प्रवासात समाधान नावाच्या मन इच्छित स्थळी पोहचण्याच्या अगोदरच आनंद निघून जाणे. यालाच आयुष्य म्हणत नाही का ? या प्रवासात व्यक्तीला भेटलेले असंख्य सहप्रवासी त्यांचे ही अनुभव म्हणजे म्हणजे आयुष्यच ना ! व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासातील त्याच्यात असणाऱ्या सर्व सुप्त गुणांनी त्याला दिलेला क्षणिक तसेच चिरकाल टिकेल असा आनंद म्हणजे आयुष्य होय. प्रेम, राग, लोभ, मद, मोह, मत्सर, कर्तव्य, स्वाभिमान, गर्व, त्याग या सारख्या अनेक गोष्टीं जेव्हा व्यक्तीला स्वतःचे सुप्त मन शोधायला लावतात. हा सुप्त मन शोधण्याचा प्रवास म्हणजे आयुष्य होय. अनेक वेळा व्यक्ती क्षणिक आनंदाच्या नादात स्वतःचं अस्तित्व विसरून जातो. त्याला क्षणिक आनंदातून कुठलेच समाधान ही भेटतं नाही. सुप्त मनाचा स्पर्श तर लांबच राहतो.
जेव्हा व्यक्ती मृत्युच्या उंबरठ्यावर पोहचते तेव्हा थोडा पुसटसा सुप्त मनाचा स्पर्श त्याला होऊ लागतो. त्या सुप्त मनातून आवाज येतो वेड्या कितीदा तुला आवाज दिला आणि सांगितले राग, लोभ, मद, मोह, मत्सर, स्वाभिमान, गर्व, पद, प्रतिष्ठा यातून मिळणारा क्षणिक आनंदाला तू तुझे आयुष्य मानतोय. पण हे खरे आयुष्य नसून तुझ्या कर्मातून एखाद्याला मिळालेला आत्मिक आनंद म्हणजे आयुष्य. आयुष्य म्हणजे नेमके काय ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापेक्षा व्यक्तीने जन्म-मृत्युच्या दरम्यानच्या काळात चांगले कर्म करून स्वतःच्या सुप्त मनाबरोबर इतरांच्या सुप्त मनाला दिलेला तसेच चिरकाल टिकेल असा आनंद म्हणजे आयुष्य होय. त्यासाठी व्यक्तीने आयुष्य म्हणजे काय या प्रश्नात अडकून पडण्यापेक्षा निखळ आनंदी निस्वार्थपणे जगावे. स्वप्नं निश्चित पहावीत त्यासाठी अथक प्रयत्न ही करावे. फक्त ती पूर्ण झाल्यामुळे गर्व आणि स्वाभिमान अंगी बाळगू नये. म्हणजे मृत्यूच्या उंबरठ्यावर आपण एकटे पडत नाही व स्वप्नंपूर्ण होऊन ही आयुष्य म्हणजे काय ? हा प्रश्न व्यक्तीला पडत नाही. तसेच ही स्वप्नं अपूर्ण राहिल्यास त्याचे दुखः करत बसू नये.
कारण स्वप्नं पूर्ण करण्याच्या प्रवासात अनेक चांगले अनुभव व्यक्तीने घेतलेले असतात. त्या अनुभवांनी व्यक्तीच्या जगण्याला एक नवी दिशा मिळालेली आणि ही मिळालेली नवी दिशा, अनुभव म्हणजेच आयुष्य होय. याचे समाधान व्यक्तीने मानवे. प्रत्येक व्यक्ती जीवनाच्या शेवटी विचार करत बसतो. मी काय कमावले आणि काय गमावले ? हेच का आपले आयुष्य होते ? खरेतर जीवनातील प्रत्येक क्षण म्हणजे आयुष्य होय. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. तसेच किती ही दुखः असो, संकट असो याचा विचार न करता आनंदी आणि समाधानी राहावे. हेच खरे आयुष्य !
- सचिन व्ही. काळे ( भ्रमणध्वनी : 9881849666 )