औरंगाबाद : ‘जे रोज ऐक्याला विरोध करीत आहेत, त्यांच्या सभा उधळा. त्यांना वस्त्या-वस्त्यांमध्ये प्रवेशबंदी करा’ असे खुले आवाहन आज येथे रिपाइं ‘ए’चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंबेडकरी जनतेला केले व ऐक्य होत असेल तर मी मंत्रिपदालाही लाथ मारायला तयार असल्याची ग्वाही दिली.
जबिंदा लॉन्सवर आयोजित रिपाइं ‘ए’च्या मराठवाडा विभागीय मेळाव्यात ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी रिपाइं ‘ए’चे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम हे होते. उद्घाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे खूपच उशिरा आले. ते गोव्याहून या मेळाव्यासाठी उशिरा का होईना आले, असा खुलासा स्वत: आठवले यांनी केला. मात्र, प्रमुख पाहुण्यांपैकी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे पश्चिमचे आमदार संजय शिरसट यांनी मात्र या मेळाव्याकडे पाठ फिरवली. ते आलेच नाहीत. आजच्या मेळाव्याचे आकर्षण ठरल्या रिपाइं ‘ए’ महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले व चिरंजीव जीत आठवले. सीमा आठवले यांनी तर रामदास आठवले यांच्याप्रमाणेच कवितांच्या ओळी सादर करीत व टाळ्या मिळवत आपले भाषण केले.
आव्हान पेलले गेले नाही... सध्या रिपाइं ‘ए’चे विभागवार मेळावे सुरू आहेत. मुंबई, सोलापूरनंतर आज औरंगाबाद विभागाचा मेळावा झाला. महामेळावा असे नाव दिले होते तरी तेवढ्या ताकदीचा हा मेळावा वाटला नाही. तेथे मांडून ठेवलेल्या संपूर्ण खुर्च्याही भरल्या नव्हत्या. विशेष म्हणजे स्वत: रामदास आठवले यांनी या मेळाव्याची उत्सुकता वाढवली होती. २ आॅक्टोबर रोजी ज्या जबिंदा लॉन्सवर वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली अॅड. बाळासाहेब आंबेडकर व खा. असदुद्दीन ओवेसी यांची सभा झाली होती, ते मैदान आम्ही मराठवाडा विभागीय मेळाव्याच्या माध्यमातून भरून दाखवू, असे आव्हान आठवले यांनी दिले होते. २ आॅक्टोबर रोजी सभा २८ विविध जाती समूहांची आणि एमआयएमची होती. आजचा आमचा मेळावा फक्त रिपाइं ‘ए’चा आहे, असे स्पष्टीकरण द्यायला अनेक वक्ते विसरले नाहीत.
राहुल गांधींना सेंच्युरी मारू देणार नाही... ‘२०१९ ची मॅच आम्हीच जिंकणार. राहुल गांधी यांना फार तर ६०-७० रन काढू देणार; पण सेंच्युरी मारू देणार नाही (हंशा व टाळ्या).