पक्ष वाढवण्याचा सर्वांना अधिकार, त्याचा वेगळा अर्थ काढणे चुकीचे : अमित देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 07:00 PM2021-07-16T19:00:58+5:302021-07-16T19:01:47+5:30
Minister Amit Deshmukh News : छगन भुजबळ व देवेंद्र फडणवीस यांची ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक झाली, ही चांगली गोष्ट
औरंगाबाद : महाविकास आघाडीच्या सरकारला कसलाही धोका नाही. हे सरकार स्थिर आहे. मात्र, ज्या त्या पक्षाला आपापला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्याचा वेगळा अर्थ काढणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री व औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेसचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी येथे केले. महागाई विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळासह निवेदन देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ते पत्रकारांशी बोलत होते.
तत्पूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळा, शहागंज येथून सायकल रॅली काढण्यात आली. स्वतः देशमुख पदाधिकाऱ्यांसह सायकलवर बसून या रॅलीव्दारे जिल्हाधिकारी कार्यालयात आले. तर सय्यद अक्रम व खालिद पठाण हे हातात तिरंगा ध्वज फडकवत, उंटावर बसून रॅलीत सहभागी झाले.
पत्रकारांशी बोलताना देशमुख यांनी आरोप केला की, केंद्र सरकार पेट्रोल- डिझेल व जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ करुन सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावत आहे. याबद्दलचा वाढता रोष लक्षात घेता २०२४ साली देशात काँग्रेसची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. छगन भुजबळ व देवेंद्र फडणवीस यांची ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक झाली, ही चांगली गोष्ट होय. यातून काही चांगले निष्पन्न होईल अशी अपेक्षा करु या, अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी व्यक्त केली.
या रॅलीत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, आंदोलन समन्वयक डॉ. जितेंद्र देहाडे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, मोहित जाधव, डॉ. निलेश अंबेवाडीकर, मुजफ्फर खान पठाण, गौरव जैस्वाल यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.