औरंगाबाद : बीबी- का- मकबरा, पाणचक्की व बावन दरवाजे, फक्त एवढ्यापुरतीच शहरातील वारसा स्थळे मर्यादित नाहीत. निजामाचा, मुगलांचा इतिहास सांगणाऱ्या अनेक खाणाखुणा या शहरात अजूनही तग धरून आहेत; पण या दुर्लक्षित वारसा स्थळांची कायमच उपेक्षा होत आली असून, दि.१९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या जागतिक वारसा सप्ताहानिमित्त तरी या स्थळांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जावे, अशी अपेक्षा इतिहासप्रेमींनी व्यक्त केली.
जनसामान्यांमध्ये प्राचीन वारसा स्थळांबद्दल जागृती निर्माण करणे, भावी पिढ्यांमध्ये सांस्कृतिक वारसा स्थळांविषयी आस्था निर्माण करणे, या उद्देशाने भारत सरकारतर्फे दि.१९ ते २५ नोव्हेंबर या काळात जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जातो. या काळात अनेक संस्था आणि शासनातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, हे कार्यक्रम केवळ प्रसिद्ध वारसा स्थळांपर्यंतच मर्यादित राहतात.
गोगाबाबा टेकडी परिसरात अशीच एक बुरुजासारखी वाटणारी ऐतिहासिक वास्तू (छत्री) असून, आता ती शेवटच्या घटका मोजत आहे. वर गोल घुमट आणि नक्षीदार खांब, अशा स्वरूपाची ही वास्तू आजही इतिहास अभ्यासकांसाठी अभ्यासाचा विषय आहे. या वास्तूबद्दल कोणतीच ठोस माहिती उपलब्ध नाही; पण जुन्या काळी बाहेरून शहरात येण्यासाठी जे रस्ते असायचे त्या प्रत्येक रस्त्यावर असे बुरूज उभे होते. त्यांना त्या काळातील चौकशी कक्ष, असेही म्हणता येईल, असे काही अभ्यासकांचे मत आहे.
शहरवासीयांची अनास्था
केंद्रीय पुरातत्व विभाग, औरंगाबादचे उपअधीक्षक शिवकांत वाजपेयी या वारसा स्थळाबद्दल सांगताना म्हणाले की, केंद्रीय पुरातत्व विभागाकडे केवळ मकबरा, रंगीन दरवाजा, मकाई दरवाजा आणि दिल्ली दरवाजा या वास्तू आहेत. औरंगाबाद शहरात सर्वत्र अशा ऐतिहासिक वास्तू विखुरलेल्या असून, काहींचे संवर्धन महानगरपालिकेच्या हद्दीत आहे, तर अनेक वास्तूंची साधी नोंदही कोणाकडे नाही. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात नव्या वास्तू उभारताना जुन्या वास्तूंचे जतन करणे आवश्यक आहे. अधिकारी येतात आणि जातात. मात्र, या शहरातील नागरिकांना या वास्तंूबद्दल अनास्था असणे हे मोठे दुर्दैव आहे. आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांप्रमाणे या वास्तूंचे संवर्धन शहरवासीयांनी करावे, असेही त्यांनी सूचित के ले.