पडेगावच्या प्रिया कॉलनीतील रहिवाशी अन्सार खान यांनी सांगितले की, आज तिसऱ्यांदा मी रक्तदान केले आहे. रक्तदानानंतर कोणताही त्रास होत नाही, कोणताही गैरसमज न बाळगता रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
------
रक्तदानातूनच मानवतेचे दर्शन
महावीर इंटरनॅशनल झोन चेअरमन राजकुमार बाठिया यांनी आपल्या ५८ व्या वर्षी आज ५३ वे रक्तदान केले. महावीर इंटरनॅशनलच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. त्यांनी सांगितले की, रक्ताचा तुटवडा असताना लोकमतने पुढाकार घेऊन राज्यात रक्तदान शिबिर भरविले, हे मोठे योगदान आहे. यातून संकलित होणारे रक्त शेकडो लोकांना वेळेवर मिळेल व त्यांचे प्राण वाचतील. प्रत्येकाने रक्तदान करावे, हेच आवाहन आहे.
-----------------------
ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्याने केले रक्तदान
ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते जनार्धन पिंजरकर यांनी आज रक्तदान केले. यापूर्वी त्यांनी चार वेळा रक्तदान केले आहे. आपण स्वत:साठी जगतो दुसऱ्यांसाठी जगण्याचा आनंद रक्तदान केल्यावर मिळतो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
-------
५५ वर्षीय महिलेने केले रक्तदान
ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्स ग्रुपमधील ५५ वर्षीय मंजुश्री जोशी यांनी आज रक्तदान करीत सर्वांना रक्तदानासाठी प्रेरित केले. त्या म्हणाल्या की, महिलांमध्ये रक्तदान करण्याची खूप इच्छा आहे पण हिमोग्लोबीन कमी असल्याने त्यांना रक्तदानापासून वंचित रहावे लागते. मागील १० वर्षांपासून रक्तदान करीत असून आजचे १५ वे रक्तदान आहे.