औरंगाबाद : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या संत एकनाथ रंगमंदिराचे लोकार्पण मंगळवारी सायंकाळी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रंगमंदिरात नवीन खुर्च्या बसविण्यात आल्या आहेत. अत्यंत निकृष्ट दर्जाच्या या खुर्च्या असून, आतापासूनच त्या हलत आहेत. विशेष बाब म्हणजे रंगमंदिराच्या डागडुजीवर तब्बल ८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
महापालिकेने २०१७ मध्ये रंगमंदिर डागडुजीसाठी बंद केले होते. सुरुवातीला अडीच कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. नंतर विविध विकास कामे वाढत गेली. त्यामुळे खर्च ८ कोटींपर्यंत पोहोचला. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मनपाकडे नव्हता. शेवटी स्मार्ट सिटी आणि जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून काम पूर्ण करण्यात आले. व्यासपीठाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात आले. विद्युत व्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा, पडदे, रंगरंगोटी, सौंदर्यीकरण ही कामे उत्कृष्ट झाली आहेत. मात्र, एक उणीव त्रासदायक ठरत आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी नवीन खुर्च्या बसविल्या आहेत. त्यांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर येत आहे. आतापासूनच या खुर्च्यांचे नट-बोल्ट गळून पडत आहेत. अनेक खुर्च्या हलत आहेत. अशा खुर्च्या कोणी बसविल्या, त्यावर किती खर्च झाला, याची चौकशी होणेही तितकेच गरजेचे आहे.
पूर्वसंध्येला प्रशासकांकडून आढावारंगमंदिरातील विविध सोयी-सुविधांचा आढावा सोमवारी मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणाऱ्या सोहळ्याचे नियोजन त्यांनी केले. त्यांनी रंगमंदिराची पाहणी करून सूचना दिल्या. पाण्डेय यांनी आसन व्यवस्था, रंगमंच व्यवस्था, साउंड सिस्टिम, विद्युत व्यवस्था, बाल्कनी, फायर व एक्झिटची बारकाईने पाहणी केली. यावेळी जीएसटी आयुक्त जी. श्रीकांत, शहर अभियंता एस. डी. पानझडे, नगररचना उपसंचालक ए.बी. देशमुख, जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद, उपअभियंता बी. के. परदेशी, मोहिनी गायकवाड उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांनी सॅम्पल मंजूर केले...
संत एकनाथ रंगमंदिरातील निकृष्ट दर्जाच्या खुर्च्यांबद्दल थेट शहर अभियंता एस.डी. पानझडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, नियमानुसार खुर्च्या बसविण्यासाठी निविदा काढण्यात आली. ज्या निविदाधारकाची निविदा अंतिम करण्यात आली, त्या एजन्सीने सॅम्पल म्हणून काही खुर्च्या आणून दाखविल्या. तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी सध्या बसविलेल्या खुर्च्यांना मान्यता दिली. कितीही महाग खुर्च्या बसविल्या तरी त्यांचा वापर कशा पद्धतीने होतो, यावर बरेच काही अवलंबून असते. प्रेक्षक खुर्च्यांवर उभे राहून नाचत असतील तर त्या खराब होणारच. सध्या बसविण्यात आलेल्या खुर्च्या चांगल्याच आहेत, असेही त्यांनी नमूद केले.