सत्तेसाठी काय पण ! जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या स्वतंत्र गटाचा कल भाजपकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 02:25 PM2019-05-27T14:25:32+5:302019-05-27T14:29:40+5:30
सिल्लोड, कन्नड, पैठण, औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यातील सदस्य फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरणे बदलण्यासाठी राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपची युती झालेली असली, तरी ती किमान जिल्हा परिषदेत पुढे कायम राहीलच, याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. काँग्रेसच्या ११ सदस्यांना सोबत घेऊन एक स्वतंत्र गट स्थापन करायचा. सत्तेत असलेली शिवसेनेची साथ सोडायची आणि भाजपसोबत हातमिळवणी करायची. या अनुषंगाने जिल्हा परिषदेत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या आठवडाभरात यासंबंधीचे चित्र स्पष्ट होईल, असे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वीच उमेदवारीच्या मुद्यांवरून काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध दंड थोपटले. पद आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला. त्यानंतर स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय ऐनवेळी मागे घेतला. निवडणूक प्रचाराच्या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सत्तार यांना पक्षातून काढून टाकल्याचे जाहीर केले. त्यानंतर सत्तार यांनी मुख्यमंत्री तसेच भाजप प्रदेशाध्यक्षांसोबत जवळीक साधली. नुकतच्या जाहीर झालेल्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेतील काँग्रेस सदस्यांचा एक वेगळा गट स्थापन करून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय झालेला आहे. या गटासाठी सिल्लोड तालुक्यातून निवडून आलेले चार सदस्य, कन्नडचे तीन सदस्य, पैठण, औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यातील प्रत्येकी एक सदस्य गळाला लागू शकतो. असे असले तरी वेगळा झालेला हा काँग्रेसचा गट सेनेसोबत राहावा, यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते.
दरम्यान, जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १६ सदस्य निवडून आलेले आहेत. काँग्रेसचा स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी ११ सदस्यांची आवश्यकता आहे. सध्या १० सदस्यांची जुळवाजुळव झालेली आहे. कोणता एक सदस्य गळाला लागतो, यासाठी चाचपणी सुरू आहे. अडीच वर्षांनंतर या स्वतंत्र गटातील काही सदस्य थेट भाजपमध्ये प्रवेश घेण्याच्या तयारीत आहेत, हे विशेष!
सत्ताबदल होण्याची शक्यता
जिल्हा परिषदेत भाजप सर्वाधिक २३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता; परंतु शिवसेनेने काँग्रेससोबत हातमिळवणी करीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. सेना-काँग्रेस आघाडीची जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाली, ती सध्याही आहे. अध्यक्षपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असल्यामुळे सप्टेंबरअखेरपर्यंत जिल्हा परिषदेत हा सत्ताबदल अपेक्षित आहे. सिल्लोड, कन्नड, पैठण, औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यातील सदस्य फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जि.प.तील संख्याबळ
भाजप - २३
शिवसेना - १८
काँग्रेस - १६
राष्ट्रवादी - ०२
मनसे - ०१
रिपाइं - ०१
अपक्ष - ०१
एकूण - ६२