औरंगाबाद: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेची होत असलेली वाताहत थांबविण्याच्या शेवटचा प्रयत्न म्हणून काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना अत्यंत भावनिक साद घातली. आमदारांनी येऊन मला गाऱ्हाणे मांडावे मी मुख्यमंत्री पद, शिवसेना प्रमुख पद सोडतो असे थेट आवाहन ठाकरे यांनी केले. यावर आता बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी पत्राद्वारे मनमोकळे केले आहे. शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या निर्णय का घेतला, पक्षातील बडवे यावर भाष्य करत काल तुम्ही जे बोललात, ते अत्यंत भावनिक होते, पण त्यात आमच्या प्रश्नांची उत्तरे कुठेच नव्हती, असा सवालही आ. शिरसाट यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना या खरमरीत पत्राद्वारे केला आहे.
महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेत बंड झाल्याने राज्यातील सरकार अस्थिर झाले आहे. शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५५ पैकी आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा केला आहे. यासोबत हा आकडा ५० पर्यंत जाणार असेही शिंदे यांनी जाहीर केले. या सर्व राजकीय भूकंपामुळे व्यस्थित झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल अखेरचा प्रयत्न म्हणून सेना आमदारांना भावनिक साद घातली. आजारपणामुळे भेटता आले नाही, पण कोणाचे काम अडले नाही. थेट मला येऊन गाऱ्हाणे मांडा मी मुख्यमंत्रीपद सोडतो, पक्ष प्रमुख पद देखील सोडतो, फक्त हे एका शिवसैनिकाने सांगावे, अशी भावनिक हाक मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री वर्षा बंगला रिकामा करून मातोश्रीवर राहायलाही गेले. या सर्व प्रकारावर एकनाथ शिंदे गटातील औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहून अनेक प्रश्न उपस्थित केले करत शिंदे यांच्यासोबत जाण्याचे कारणही सांगितले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूच्या बडव्यांकडून स्वपक्षीय आमदारांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करत बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी लिहिलेलं हे पत्र एकनाथ शिंदे यांनीही ट्विट केले आहे. पत्रात शिरसाट यांनी, ''काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मुळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं.'' असे मत व्यक्त केले आहे.
बडव्यांची मनधरणी करावी लागत होतीकाल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही, असेही शिरसाट यांनी पत्रात मांडले आहे.
कंटाळून आम्ही निघून जायचोमतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे ?