लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहराबरोबरच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था काहीसी सुधारत असली तरी वाहनांची वाढती संख्या आणि वाहनचालकांचा वाहतूक नियमांकडे होत असलेला कानाडोळा यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. मागील तीन वर्षांत जिल्ह्यात विविध रस्ते अपघातांमध्ये ८१३ जणांचा मृत्यू झाला असून १३१० पेक्षा अधिक जण जायबंदी झाले आहेत.मागील काही दिवसांत नांदेड शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत अपघातांची मालीकाच सुरु आहे. २३ आॅगस्ट रोजी शहरातील जुना मोंढा नाक्यावर दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला. तर २४ आॅगस्ट रोजी देगलूरहून नांदेडकडे जाणारी ट्रॅव्हल्स उलटून चौघांना प्राण गमवावे लागले. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला होता. यात देगलूरमधील मायलेकीचाही मृत्यू झाला. २५ आॅगस्ट रोजी पैनगंगानदीवर ट्रकच्या धडकेने कार नदीत कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यात आ. अनिल गोटे यांच्या बंधूसह त्यांच्या भावजयीला प्राणास मुकावे लागले. भरधाव ट्रकचालक या अपघातास कारणीभूत ठरला. त्यानंतर २९ आॅगस्टही अपघातवार होता. नांदेड-लातूर रस्त्यावर मुसलमानवाडीजवळ जीप आणि टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. अपघाताची ही मालीका ३० आॅगस्ट रोजीही सुरुच राहिली. मुखेड शहरानजीक महाजन पेट्रोलपंपाजवळ कार-मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात चुलत्या-पुतण्यासह तिघांचा बळी गेला. शेतकरी असलेले हे चुलते-पुतणे बी-बियाणे आणण्यासाठी निघाले होते. एकूणच मागील आठवडाभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या अपघातांच्या घटनांमुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.२०१४ मध्ये जिल्ह्यात ७०९ अपघातांच्या घटना घडल्या. यात २७४ जणांचा मृत्यू झाला असून ४४४ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर १५३ प्रवासी किरकोळ जखमी झाले. २०१५ मध्येही अपघातांचे सत्र सुरुच राहिले.या वर्षात विविध अपघातांत २५८ नागरिकांना प्राण गमवावे लागले. तर ४१८ नागरिक या अपघातांमुळे जायबंदी झाले. या वर्षात किरकोळ जखमी झालेल्यांची संख्या ६९ एवढी होती. तर २०१६ मध्ये २८१ जण मृत्यूस मुकले. जिल्ह्यात ७८७ अपघात होऊन त्यात ४४८ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. किरकोळ जखमींची संख्याही १७५ पेक्षा अधिक असल्याचे प्रशासनाकडील आकडेवारी सांगते.
अपघातांचे दुष्टचक्र थांबेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 12:11 AM