लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील ७५ ग्रा.पं.च्या निवडणुकीचे निकाल सोमवारी घोषित झाले. शिवसेना पुरस्कृत पॅनलचे २७, राष्ट्रवादी २४, भाजप १५ तर ११ ठिकाणी अपक्ष सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. एकंदरीत दोन विद्यमान आमदारांना माजी मंत्र्यांनी जोर देत जोरदार मुसंडी मारली असुन सर्वाधिक ग्रामपंचायत ताब्यात आणण्यात यशस्वी झाले आहेत. तर दैठणमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली असुन सत्ता परिवर्तन होऊन आ.अमरसिंह पंडित यांच्या ताब्यात ही ग्रामपंचायत आली आहे.राष्ट्रवादीचे आ.अमरसिंह पंडित, भाजपचे आ.लक्ष्मण पवार तसेच शिवसेनचे नेते तथा माजी मंत्री बदामराव पंडित यांनी या निवडणुका ताब्यात घेण्यासाठी ताकद लावल्याने ग्रामपंचायत निवडणुका प्रतिष्ठेच्या बनल्या होत्या. सर्वात लक्षवेधी ठरलेली दैठण ग्रामपंचायतवर माजी मंत्री बदामराव पंडीत यांचे वर्चस्व होते. मात्र यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व सिद्ध करत आ.अमरिसंह पंडित यांच्या ताब्यात दैठण ग्रामपंचायत आली आहे. मिरकाळा येथे भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना अशी तिरंगी लढत होती. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच पदाचे पांडुरंग मुंडे हे एका मतांनी विजयी झाले. त्यानंतर विरोधी भाजप गटाचे पांडुरंग ढाकणे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. परंतु उपयोग झाला नाही. मशीन मध्ये एका मताचा घोळ असुन उमेदवार एकाच मताने पराभूत झाल्याने भाजपने या मशीनवर आक्षेप नोंदवला होता मात्र हा दावा फेटाळला.
गेवराईत माजी मंत्र्यांची मुसंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 11:42 PM