औरंगाबाद : वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी आपल्याला बाराशे रुपये दंड लावल्याचे समजताच चिडलेल्या माजी सैनिकाने फौजदारासोबत वाद घालून त्यांना हेल्मेट मारले आणि त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाचा चावा घेतला. यावेळी फौजदाराच्या मदतीला आलेल्या हवालदाराच्या बोटालाही त्याने चावा घेतल्याची घटना महावीर चौकात २६ मे रोजी दुपारी घडली. या घटनेप्रकरणी आरोपी माजी सैनिक भगवान कृष्णाजी सानप (वय ५५, राजयश्री कॉलनी, मुकुंदवाडी) याच्याविरुद्ध वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविला.
या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, छावणी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड हे आणि कर्मचारी बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास वाहतूक नियमन करीत होते. यावेळी विना हेल्मेट दुचाकीस्वार सानपला त्यांनी अडविले. यावेळी तुम्ही मलाच का अडविले, असे म्हणून त्याने फौजदार बनसोड यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्याची समजूत काढून पोलिसांनी त्याच्याजवळ गाडीची कागदपत्रे नव्हती, म्हणून दंड लावायला सांगून त्याला सोडून दिले. सुमारे एक वाजेच्या सुमारास सानप महावीर चौकात दुचाकी घेऊन आला. तुम्ही मला बाराशे रुपये दंड का लावला, असे म्हणून फौजदार बनसोड यांच्या अंगावर सानप धावून आला आणि शिवीगाळ करू लागला. शिव्या देऊ नका असे सांगत असताना सानपने दुचाकीला लावलेले हेल्मेट घेतले आणि बनसोड यांना मारले. यावेळी बनसोड त्याचा प्रतिकार करीत असताना सानपने त्यांच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाला चावा घेतला. यामुळे त्यांचे बोट रक्तबंबाळ झाल्याने ते ओरडले. तेथे जवळच असलेल्या हवालदार माळी त्यांच्या मदतीला आले असता सानपने त्यांच्याही डाव्या हाताच्या बोटाचा चावा घेऊन त्यांना जखमी केले. यावेळी अन्य पोलीस कर्मचारी आणि रिक्षाचालकांनी त्यांना पकडून शांत केले. यानंतर वेदांतनगर ठाण्यात त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविला.