पैठण : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पैठण नगरपरिषदेने माजी सैनिकांना सर्व प्रकारच्या करातून माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसाधारण सभेनंतर नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी याबाबत माहिती दिली. माजी सैनिकांनाकरमाफी द्यावी अशी मागणी नगरपरिषदेचे जेष्ठ नगरसेवक प्रकाश वानोळे यांनी सातत्याने लावून धरली होती. नगरपरिषदेच्या या निर्णयाचे शहरवासीयांनी स्वागत केले आहे.
पैठण नगरपरिषदेच्या सभागृहात आज नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत माजी सैनिकांना करमाफी देण्यासोबत नाथषष्ठी यात्रा महोत्सव २०२० करिता विविध कामाची निवड करून मंजुरी प्रदान करणे., पालिका हद्दीमध्ये ए . टी . एम ( ATM ) मशीन बसवणे व त्यास जागा उपलब्ध करून देणे, नगर परिषदेचा मालकीच्या खुल्या जागेवर विना परवानगी होणाऱ्या कार्यक्रमाबाबत कारवाई करणे, शहरातील आरक्षण क्र . २८ , २९ , ३० , ३१ चा वापरात बदल करणे, आरक्षण क्र . २८ , २९ , ३० , ३१ चे भूसंपादन करणे, यात्रा काळात लागणारे राहाटपाळणे करिता जागा निश्चित करून जागा वाटपाची पद्धत ठरविणे आदी ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आले.
सर्वसाधारण सभेसाठी नगराध्यक्ष सुरज लोळगे, उपनगराध्यक्ष सुचित्रा जोशी, दत्ता गोर्डे, भूषण कावसानकर, तुषार पाटील, आबा बरकसे, हसनोद्दीन कटयारे, कल्याण भुकेले, बजरंग लिंबोरे, मैमुना बागवान, ज्ञानेश घोडके, सोमनाथ परळकर, ईश्वर दगडे, सविता माने, अलका परदेशी, शोभा लोळगे, अजित पगारे, संगीता मापारी, पुष्पा वानोळे, प्रकाश वानोळे, डॉ विष्णू बाबर, माया आडसूळ, आशा आंधळे, टेकडी, आदी उपस्थित होते.
नवीन दारूच्या दुकानांना आता परवानगी नाहीपैठण शहरात आता यापुढे दारूच्या दुकानास परवानगी नाकारण्यात येणार आहे. पैठण शहरात मोठ्या संख्येने दारूच्या दुकाना असून आणखी दारूच्या दुकाना शहरात नको असा सुर शहरातील नागरिकातून होत होता. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या सर्वसाधारण सभेत पैठण न . प . हद्दी अंतर्गत नविन दारूच्या दुकानाचे परवाने ( मद्य परवाने ) न देण्याचा निर्णय घेण्यात आला.