औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील मोहाडी येथील सातपुडा विकास मंडळ संचलित कला वरिष्ठ महाविद्यालयात १० आॅक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना अधिकृतपणे प्रवेश देण्यात आले आहेत. यानंतर अवघ्या पाचव्या दिवशी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा घेण्यास सुरुवात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
१२ वर्षांपासून बंद पडलेल्या मोहाडी येथील महाविद्यालयाला विद्यापीठ प्रशासनाने नियमबाह्यपणे २५ सप्टेंबर २०१८ रोजी संलग्नता दिली. त्यास राज्य सरकारच्या उच्चशिक्षण विभागाने २७ सप्टेंबर रोजी मान्यता नाकारून कायद्यात पुनर्संलग्नता देण्याचा नियमच नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर विद्यापीठाने त्या महाविद्यालयावर कोणतीही कारवाई केली नाही.
याच कालावधीत संबंधित संस्थाचालकाने राजकीय शक्तीचा वापर करून नाकारलेल्या प्रस्तावाला ८ आॅक्टोबर रोजी राज्य सरकारकडूनच स्थगिती मिळविली. तोपर्यंत विद्यापीठ प्रशासनाने राज्य सरकारचे पत्र दडपून ठेवले. यानंतर त्या महाविद्यालयाने विद्यापीठाच्या एमकेसीएल यंत्रणेमार्फत ६८ विद्यार्थ्यांना १० आॅक्टोबर म्हणजेच पाच दिवसांपूर्वी प्रवेश दिले. या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज शनिवारी (दि.१३) भरण्यात आले. परीक्षा अर्ज भरल्यानंतर अवघ्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. १५) सकाळी १० ते १ यावेळेत विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचा प्रताप समोर आला.
विशेष म्हणजे सुटीच्या दिवशी या महाविद्यालयाला परीक्षा केंद्र देण्याचा निर्णय थेट कुलगुरूंच्या आदेशामुळे घेतल्याची माहिती परीक्षा केंद्र वाटप समितीचे सदस्य डॉ. नवनाथ आघाव यांनी दिली. तर परीक्षा संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांना विचारले असता, त्यांना याविषयी कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. या महाविद्यालयातील ६८ पैकी ३० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोहाडीच्या महाविद्यालयाला विद्यापीठाने २५ सप्टेंबर रोजी संलग्नता देताना सर्व प्राध्यापक, प्राचार्य भरण्यासह पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश दिलेले आहेत. आतापर्यंत महाविद्यालयाने एकही अधिकृत प्राध्यापक नेमलेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना चार दिवसांत सगळा अभ्यासक्रम कोणी शिकविला हा प्रश्न निर्माण झाला आहे.
९० दिवसांचा अभ्यासक्रम चार दिवसांत पूर्णच्विद्यापीठ नियमानुसार प्रवेश झाल्यापासून ९० दिवसांच्या आत परीक्षा घेता येत नाही. मात्र मोहाडीच्या महाविद्यालयाने मान्यता घेताना अधिकचे तास घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची हमी दिली होती. यामुळे प्राध्यापक नसताना अवघ्या चार दिवसांत ९० वर्किंग दिवसांचा अभ्यासक्रम कोणी पूर्ण केला, याचे उत्तर विद्यापीठ प्रशासनाला देता आले नाही.