छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सलग्न महाविद्यालयातील १ लाख १७ हजार विद्यार्थ्यांची पदवी परीक्षांना मंगळवारपासून (दि.२१) सुरुवात होणार आहे. २३९ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, गैरप्रकार रोखण्यासाठी ३२ भरारी पथकांची स्थापना केल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत परीक्षांच्या वेळापत्रकास मान्यता दिली होती. त्यानुसार जून्या अभ्यासक्रमांच्या पदवीच्या सत्र परीक्षांना २१ नोव्हेंबरपासून तर नवीन अभ्यासक्रमांच्या परीक्षांना १ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. जुन्या व नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ९ डिसेंबरपासून तर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या २१ डिसेंबर, विधि २९ डिसेंबर, औषधनिर्माणशास्त्र १ डिसेंबर आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना २९ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. जुन्या पॅटर्नप्रमाणे पदवी परीक्षांसाठी चार जिल्ह्यात २३९ परीक्षा केंद्र आहेत. तर एकुण ३२ भरारी पथके परीक्षेवर नियंत्रण ठेवतील. तसेच प्रत्येक केंद्रावर केंद्रप्रमुख व सहकेंद्रप्रमुख असे ४६८ जण कार्यरत असणार आहेत. या सर्व केंद्राचे प्रमुख यांची सोमवारी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीस परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ.भारती गवळी, उपकुलसचिव डॉ विष्णू कराळे यांची उपस्थिती होती.
सर्वच निकाल वेळेवर लावण्यात येतीलया वर्षीपासून परीक्षा पद्धतीत अनेक बदल केले आहेत. परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन डेटा त्याच दिवशी भरण्याच्या सूचना केलेल्या आहेत. तसेच प्रात्यक्षिक परीक्षा संपल्यानंतर आठ दिवसाच्या आत विद्यापीठात हार्डकॉपी जमा करण्याच्या सूचनाही महाविद्यालयांना दिल्या आहेत. परीक्षेचे ऐनवेळी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे निकाल राखीव ठेवण्याची वेळ येणार नाही. मूल्यांकन केंद्रांची गरजेनुसार संख्या वाढवून सर्वच निकाल देखील वेळेवर लावण्यात येतील.- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू