लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावी बोर्डाची परीक्षा बुधवारपासून सुरू होत असून, पहिला पेपर इंग्रजीचा आहे. परीक्षेसाठी औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाची यंत्रणा सज्ज झाली आहे. या परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून १ लाख ६४ हजार ८७७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व तणावमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी भरारी पथके, व्हिडिओ शूटिंग, परीक्षा केंद्रांवर बैठी पथके, तसेच काही केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बसविण्यात आले आहेत. औरंगाबाद विभागात मागील काही वर्षांपासून कॉपीचे प्रकार वाढले होते. त्यावर विभागीय मंडळाकडून नियंत्रण ठेवण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले आहेत. विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून, जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या नेमण्यात आल्या आहेत. या परीक्षेसाठी विभागात औरंगाबाद जिल्हा- १३४, बीड जिल्हा- ९०, जालना जिल्हा- ६४, परभणी जिल्हा- ५५ आणि हिंगोली जिल्ह्यात- ३१ अशी एकूण ३७४ परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांची आजपासून परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 1:15 AM