छत्रपती संभाजीनगर : कन्नडमार्गे चाळीसगावकडे जाणाऱ्या तिकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २११ वर असलेल्या औट्रम घाटातील ११ किलोमीटर अंतरात वाहतूक खोळंबत असल्याने तो सात महिन्यांपासून बंद असून, याचा थेट परिणाम जिल्ह्यासह इतर भागांतील अर्थकारणावर झाला आहे. बोगद्याला वनविभागाकडून एनओसी न मिळण्यासह स्थानिक पातळीवरूच या कामात वारंवार खोडा आणला गेल्याची चर्चा आहे. ८ हजार कोटी रुपयांच्या आसपास बोगदा बांधणीचा खर्च केला आहे. एनएचएचआयने ते काम रद्द करून घाटाला पर्यायी मार्गही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यालाही अद्याप मुहूर्त लागलेला नाही.
तलवाडा घाटातील मार्गाची दुरुस्ती करायची असल्याने सुमारे ४ हजारांहून अधिक जड वाहने (ज्यामध्ये उद्योगांचा कच्चा-पक्का माल, जीवनावश्यक वस्तू असतात) लांबून वळसा घालून शहरात येत आहेत. धुळेमार्गे पुढे गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरयाणा या राज्यांची कनेक्टिव्हिटी मिळणारे मार्ग आहेत. तर, घाटातून मराठवाड्यासह, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिणेत व्यापारी बाजारपेठांकडे जाण्याचे मार्ग आहेत. आता घाट बंद असल्यामुळे लांबवरून वाहतूक वळली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्याऐवजी नाशिक अथवा अहमदनगरच्या दिशेने अर्थकारणाशी निगडित वाहतूक जात असल्याचे दिसते.
आर्थिक उलाढाल ठप्प....ऑगस्ट २०२३ पासून घाट जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद आहे. यामुळे मार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल, गॅरेजच्या व्यवसायावर गदा आली आहे. घाटाच्या पलीकडून येणारा भाजीपाला कन्नड व छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येणे बंद झाले. परिणामी, शेतकऱ्यांचे अर्थकारणही कोलमडले.
प्रस्ताव पाठवा, तातडीने मंजुरी देऊकेंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना २६ फेब्रुवारी रोजी विचारले असता ते म्हणाले, वनविभागाने एनओसी दिली नाही. त्यामुळे घाट चौपदरीकरणाचा पर्याय शोधला. त्यालाही वनविभागाकडून प्रतिसाद मिळाला नाही. पर्यायी मार्गाचा प्रस्ताव मुख्यालयाला पाठविला तर तातडीने मंजुरी देता येईल. घाटाला पर्याय काय असू शकेल, यावर स्थानिक पातळीवर विचार करावा.