औरंगाबाद : देशी दारूची विक्री करण्यात येत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होणे परमीट रुम रॉयल मराठाच्या मालकास चांगलेच महागात पडले आहे. त्याठिकाणी देशी दारु विक्रीचा परवाना नसल्याची बाब समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा मारला. तेव्हा त्याठिकाणी अनेक अनियमितता पुढे आल्या. त्याविषयीचा अहवाल जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी परमीट रुमचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांना फुलंब्री-खुलताबाद रोडवरील वानेगाव फाटा येथील परमीट रुम रॉयल मराठा याठिकाणी देशी दारू विक्री करण्यात येत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियातून मिळाला. त्यानुसार झगडे यांनी 'क' विभागाचे निरीक्षक नारायण डहाके यांना संबंधित ठिकाणी छापा मारण्याचे आदेश दिले. त्यानुसार ८ जानेवारी रोजी छापा मारला तेव्हा त्याठिकाणी देशी दारु विक्री केली जात असल्याचे स्पष्ट झाले. त्याठिकाणी व्यवस्थापक कैलास कुंटे हे देशी दारू विक्री करीत होते. संबंधितांवर गुन्हे नोंदवून त्याविषयीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला.त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी १२ जानेवारी रोजी चौकशी पुर्ण होईपर्यंत परमीट रुमचा परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई अधीक्षक झगडे, उपअधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक नारायण डहाके, दुय्यम निरीक्षक एस.डी. घुले, सहायक दुय्यम निरीक्षक आर.एम. भारती, एस.एस. खरात, बी.सी. किरवले,ए.एस. अन्नदाते यांनी केली.
हॉटेल चालकाला ३५ हजाराचा दंडबीड बायपास रोडवरील हॉटेल विराट दरबार याठिकाणी अनधिकृतपणे दारूची विक्री करून पिण्यास जागा उपलब्ध करून दिल्यामुळे 'अ' विभागाने २२ नोव्हेंबर २०२२ रोजी छापा मारला होता.या प्रकरणात न्यायालयाने हॉटेल मालक अमोल खिल्लारे (रा. रेणुकानगर, सातारा परिसर) यांच्यासह चार मद्यपिंना ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. यात मालकास २५ हजार ५०० रुपये व मद्यपिंना प्रत्येकी २ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला. ही कारवाई अधीक्षक झगडे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक ए.जे. कुरेशी, दुय्यम निरीक्षक बी.ए. दौंड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे पाटील, जवान अनिल जायभाये, विजय मकरंद, ज्ञानेश्वर सांबारे यांनी केली.