वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात गुरुवारी (दि.१४) मकरसंक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. छोट्या पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात महिलांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनानंतर सुवासिनींनी एकमेकींना हळदी-कुंकू व वाण देऊन संक्रांत साजरी केली.
महिलांनी सकाळपासूनच नवीन कपडे, साज-श्रृंगार व दागिने परिधान करून मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. परिसरातील बजाजनगर, पंढरपूर, रांजणगाव, सिडको वाळूज महानगर, वाळूज, नायगाव-बकवालनगर आदी भागातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश महिलांनी मास्क लावून व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत मंदिरात दर्शन घेतले. यानंतर मंदिर परिसरात महिलांनी एकमेकींना हळद-कुंकू व वाण देत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सुवासिनी महिलांनी फुगड्या खेळत तसेच उखाणे घेत पारंपरिक पद्धतीने संक्रांतीचा सण साजरा केला. मंदिराच्या प्रांगणात महिलांनी मोबाईलद्वारे सेल्फी काढण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती. काळाच्या ओघात विलुप्त होत जाणारी प्रथा ‘कुंभाराचा आवा लुटणे’ याचे स्मरण करीत महिलांनी अनोख्या पद्धतीने मकरसंक्रांत साजरी केली. मंदिरात कामिनी मणियार, विद्या सारडा, नीता भराटे, वैशाली तोतला, ज्योती भंडारी, वैशाली वडाळकर, सोनल वाघमारे, निर्मला खोंगडे यांच्यासह परिसरातील महिलांनी गर्दी केली होती.
दर्शनानंतर खरेदीसाठी गर्दी
श्री विठ्ठल- रुख्मिणी मंदिरात वाण देऊन दर्शन घेतल्यानंतर महिलांनी बाजारपेठेत लहान मुलांसाठी खेळणी, खाऊ, साज-श्रृंगाराचे साहित्य, सोन्या-चांदीचे दागिने व संसारोपयोगी साहित्य खरेदी केली.
फोटो ओळ
छोट्या पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दर्शन व संक्रांतीचे वाण देण्यासाठी सुवासिनी महिलांनी अशी गर्दी केली होती.