कन्नड ( औरंगाबाद ) : महाराष्द्र शासनाच्यावतीने अंगणवाडीतील बालकांना पुरविण्यात आलेल्या तांदळात प्लास्टिकसदृश तांदूळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तांदळाची प्रयोगशाळेत तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
१५ मे ते १५ जुलै २०२१ या दोन महिन्यांचा पोषण आहार चिकलठाण येथील अंगणवाड्यांना २३ जुलै रोजी वितरित करण्यात आला. हा पोषण आहार ३ ते ६ वयोगटांतील बालकांसाठी असून, त्यात प्रत्येकी २ किलो हरभरा, तांदूळ २ किलो, गहू २ किलो, मूगदाळ १ किलो, साखर १ किलो, मीठपुडी १, हळद १ पुडी व मिरची पुडी १ असा पॅकबंद पिशव्यात देण्यात आला. या आहाराचे वितरण अंगणवाड्यांमार्फत सुरू आहे.
रविवारी दुपारी श्रावणी रघू या लाभार्थी बालिकेची आई जयश्री रघू यांनी घरी तांदळाच्या दोन पिशव्या फोडल्यानंतर त्यांना यात काही दाणे हे वेगळे आढळले. त्यांनी ते निवडल्यानंतर ते प्लास्टिकसारखे दिसून आल्यानंतर ही माहिती पोलीसपाटील अरविंद धनेधर, सरपंच शिवाजी धनेधर, ग्रामपंचायत सदस्य दत्तू जाधव यांना देण्यात आली. दरम्यान, अंगणवाडी कार्यकर्ती जयश्री कंचार, सुनंदा वैष्णव, सिंधुबाई चिंधे, शोभा पवार यांनाही बोलाविण्यात आले. त्यांच्या समक्ष तांदळाची पिशवी फोडून त्यातील तांदूळ निवडून त्यांना पहिल्याप्रमाणेच कसोटी लावून तपासणी करण्यात आली. तेव्हा तांदळात प्लास्टिकसदृश तांदळाची भेसळ असल्याचे लक्षात आल्याने तसा पंचनामा करण्यात आला व पोषाण आहार वितरित करताना तांदूळ वितरित करू नये व ज्यांना पोषण आहार वितरित केला आहे. त्यांच्याकडून तांदळाच्या पिशव्या परत घ्याव्यात आणि तांदळाची प्रयोगशाळेतून तपासणी करावी असे ठरले.
लाभार्थी बालिकेच्या आईला आली शंकालाभार्थी बालिकेची आई जयश्री रघू यांनी मिळालेल्या तांदळाच्या दोन पिशव्या फोडल्या. त्यातील तांदळात काही तांदूळ पिवळसर रंगाचे दिसल्याने त्यांनी हे निवडून काढले. त्यापैकी तांदळाचा दाणा फोडण्यासाठी दाताखाली दाबला तर तो फुटण्याऐवजी चापट झाला. शंका आल्याने निवडलेला तांदूळ शिजविला. त्यातही तांदळाचे शिजलेले दाने हातावर घेऊन दाबले तर च्युइंगमसारखे सरकू लागले. त्यानंतर एका चमच्यात तांदूळ टाकून गॅसवर धरला, तर तांदुळाने पेट घेतला. तांदूळ जळाल्यानंतर चमच्याला जळालेल्या प्लास्टिकप्रमाणे थर चिकटला. त्यामुळे निवडून काढलेले तांदूळ प्लास्टिकसदृश असल्याचे लक्षात आले.
तांदूळ मनमाड येथील शासकीय गोदामातून येतो. कुठल्याही खासगी पुरवठादाराकडून येत नाही. या तांदळाची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येईल. यानंतरच निष्कर्ष काढण्यात येतील.- गहिरवाल, एकात्मिक बालविकास प्रकल्प आधिकारी