पैठण : जायकवाडी धरणाच्या जलाशयात मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास १५ फुट लांबीची महाकाय मगर धरण नियंत्रण कक्षातील कर्मचारी व सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीसांना आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दहा महिण्या पूर्वी डिसेंबर २०१९ ला जलाशयात मगरीचे दर्शन झाले होते. २००६ नंतर धरणात आतापर्यंत पाच वेळा मगर प्रकट झाली आहे. दरम्यान धरणात पोहण्यासाठी कुणी उतरू नये असे आवाहन जायकवाडी प्रशासनाने केले आहे.
जलाशयात धरण दरवाजा परिसरात महाकाय मगरीचे दर्शन झाल्याने जलाशयाच्या काठावरील शेतकरी व मच्छीमारांंची भितीने गाळन उडाली आहे. वर्षाच्या कालावधी नंतर पुन्हा मगर प्रकट झाल्याने नाथसागर जलाशयात मगरीचे वास्तव्य असल्याचे अधोरेखित झाले आहे. जायकवाडी धरणावर सुरक्षा रक्षक रात्री गस्त घालत असताना शांत पाण्यात आवाज झाल्याने धरणावरील सुरक्षा रक्षक विजय वाघमारे यांनी आवाजाच्या दिशेने बँटरी फिरवली असता महाकाय मगर पाण्यात त्यांना दिसून आली. तातडीने त्यांनी धरणावरील कर्मचारी व पोलीसांना तेथे बोलावले, बराच वेळ तेथे जलाशयात मगर होती. त्या नंतर पुन्हा थोड्या वेळाने धरण नियंत्रण कक्षाच्या पाठिमागे कर्मचाऱ्यांना मगर दिसून आली. जायकवाडी धरणाच्या जलाशयात १५ फुट लांबीची मगर आढळून आल्याने पाणीपुरवठा पंप हाऊस कर्मचाऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जलाशयाच्या काठावर विविध शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे पंप हाऊस असून या कर्मचाऱ्यांना वारंवार जलाशयाकडे जावे लागते. मगर प्रकट झाल्याने कर्मचारी धास्तावले आहे.
सन २००६ ला गोदावरीला महापूर आला होता या पुरात मगर धरणात आल्याचे बोलले जात असून याच वर्षी मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात मगरीचे पिल्ले अडकले होते या नंतर बरेच वर्ष नाथसागरात मगरीचे दर्शन झाले नाही मात्र, सन २०१५ ला परभणी जिल्हात सापडलेली मगर वनखात्याने जायकवाडी धरणात आणून सोडली होती. वनखात्याच्या या कृतीस जायकवाडी प्रशासनासह स्थानिक नागरिकांनी मोठा विरोध दर्शविला होता. २०१५ नंतर मात्र सन २०१७ ला ८ नोहेंंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास महाकाय मगर धरण परिसरातील पैठण ते दक्षिण जायकवाडी रस्त्यावर फिरताना आढळून आली होती. पैठण येथील दिलीप सोनटक्के, जालिंदर आडसूळ, राजू गायकवाड, साहेबा ढवळे आतिष गायकवाड आशिष मापारी या तरूणांनी मोठे धाडस करीत या मगरीस जेरबंद करून वन खात्याच्या हवाली केले होते. वनखात्याने दोन दिवसानंतर मगरीस नागपूर येथील पेंच अभयारण्यात हलविले होते. या नंतर २०१७, २०१८, २०१९ व यंदा जलाशयात मगर प्रकट झाली.
नाथसागरात अनेक मगर असण्याची शक्यतासाधारणपणे गोड्या पाण्यातील मगर नोहेंबर महिण्यात जलाशया बाहेर येऊन अंडे देते. एका वेळी २० ते २५ अंडे मगर देते. नोहेबर २०१७ ला जायकवाडी धरणाच्या मत्सबीज केंद्राच्या निर्जन भागातून मगर बाहेर पडताना नागरिकांच्या निदर्शनास आली होती. या मुळे या मगरीने या भागात अंडे दिले असावेत असा अंदाज वर्तविण्यात येत होता. या शिवाय २००६ च्या महापुरा प्रमाणेच यंदाच्या महापुरात अनेक मगरी जायकवाडी धरणात पुरासोबत आल्या असेही काही जणांचे म्हणने आहे. या मुळे नाथसागरात अनेक मगरी असल्याचे बोलले जात आहे.
मगरीने कुणावर हल्ला केला नाही......नाथसागरात अनेक मगर आढळून आल्या परंतू या मगरीने आतापर्यंत कुणावरही हल्ला केलेला नाही. मगरीस माणसाची चाहूल लागताच ती दूर निघून जाते असे मच्छीमारांनी सांगितले.