औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाच्या समोर दोन वाहनांमध्ये सुरू असलेला लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र देण्याचा गैरधंदा गुन्हे शाखेच्या कारवाईत उघड झाला. आरटीओच्या दोन एजंटांनी मागील महिनाभरामध्ये हजारो बनावट प्रमाणपत्रांचे वाटप केले असल्याची माहिती समोर आली आहे. या बनावट प्रमाणपत्रासाठी २०० ते ६०० रुपये एवढे शुल्क आकारण्यात येत होते. या प्रकरणात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
शहरात लस देण्याचा एक पॅटर्न प्रस्थापित झाला होता. त्याची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली. मात्र, मागील काही दिवसांपासून लस न घेताच बनावट प्रमाणपत्र वितरित करण्याचे विविध 'औरंगाबाद पॅटर्न' उघड होत आहेत. यानंतर सजग झालेल्या पोलिसांनी बोगस प्रमाणपत्राचे रॅकेट चालविणाऱ्यांच्या विरोधात मोहीमच उघडली आहे. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्ता शेळके यांना मिळालेल्या माहितीनुसार, आरटीओ कार्यालयासमोर दोन गाड्यांमध्ये बनावट लस प्रमाणपत्रांचे वाटप केले जात होते. याठिकाणी उपनिरीक्षक शेळके यांच्यासह अंमलदार किरण गावंडे, संजयसिंह राजपूत, विठ्ठल सुरे आणि नवनाथ खांडेकर यांच्या पथकाने छापा मारला. यामध्ये जवळजवळ उभ्या केलेल्या एमएच २० यू ३७४५ आणि एमएच १७ व्ही २७५९ या वाहनांमधून बनावट प्रमाणपत्र वितरित करण्याचा धंदा सुरू असल्याचे उघड झाले. या दोन गाड्यांमध्ये शेख मिनाजउद्दीन शेख अशफाकउद्दीन (वय २६, रा. प्लॉट नंबर ६-१३-२१, सिल्क मिल्क कॉलनी) आणि अदनान उल्ला मुजीब बेग (वय २०, रा. शहानगर बीड बायपास) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी निरीक्षक आघाव, उपनिरीक्षक दत्ता शेळके यांच्यासह किरण गावंडे, संजयसिंह राजपूत, विठ्ठल सुरे आणि नवनाथ खांडेकर यांनी केली. अंमलदार ओमप्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
लाखो रुपयांची उलाढालदोन्ही आरोपी प्रत्येक दिवशी १०० पेक्षा अधिक बनावट प्रमाणपत्रांचे वितरण करीत होते. या दोघांची दररोजची कमाई २० हजार रुपयांपेक्षा अधिक होती. यातून लाखोंची उलाढाल होत होती.
असे बनवायचे बनावट प्रमाणपत्र...गाडीमध्ये ठेवलेल्या लॅपटॉपमध्ये डेस्कटॉपवर क्रोम उघडून त्यावर ईजी टू युज ऑनलाईन पीडीएफ ईडीटरमध्ये जाऊन अपलोड केलेल्या पीडीएफ फ़ाईलमधून ज्ञानेश्वर जगन्नाथ गायके यांचे कोविड १९ लस प्रमाणपत्र क्रमांक ५९०८८७८३४०३० हे मूळ प्रमाणपत्र ओपन करून त्यावरून सय्यद शारीक सय्यद रहीम हे नाव, वय, आधारकार्ड क्रमांक टाकून मूळ प्रमाणपत्रात बदल करून बनावट प्रमाणपत्र बनवून दिले जात होते.