औरंगाबाद: चक्क पोलीस कर्मचाऱ्यानेच शहरात व्यवहारासाठी आलेल्या एका सराफा व्यापाऱ्याला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. साथीदाराच्या मदतीने पोलीस कर्मचाऱ्याने रोकड आणि दागिने असा जवळपास २१ लाखांचा ऐवज लुटला आहे. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात या कर्मचाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष वाघ ( सोयगाव पोलीस ठाणे), रामचंद्र दहिवाळ (रा. शेंद्रा औरंगाबाद) आरोपींचे नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोयगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत कर्मचारी संतोष वाघ आणि रामचंद्र दहिवाळ मित्र आहेत. रामचंद्र दहिवाळ याने सराफा व्यापारी असलेले अशोक जगन्नाथ विसपुते (वय- 53 वर्षे, रा.प्लॉट नं.13, सेंट्रल बैंक कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) यांना दागिने खरेदीच्या व्यवहाराच्यानिमित्ताने सोमवारी ( दि. १२ ) औरंगाबाद येथे बोलावून घेतले. विसपुते यांची भेट घेऊन दहिवाळने सोन्याच्या दागिन्यांची पाहणी केली. मात्र, त्यानंतर व्यवहार जमणार नसल्याचे सांगत तेथून निघून गेला. त्यामुळे विसपुते परत निघाले. यावेळी संतोष वाघने विसपुते यांना केंब्रिज चौकात अडवले. पोलीस असल्याचे सांगून चौकशी करण्याच्या बहाण्याने वाघ याने विसपुते यांच्याकडील १२ लाखांचे दागिने आणि साडेआठ लाख रुपयांची रोकड काढून घेतली. त्यानंतर वाघ तेथून निघून गेला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अशोक विसपुते यांनी सिडको एमआयडीसी पोलिसात धाव घेतली. विसपुते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रामचंद्र दहिवाळ आणि संतोष वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.