वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत खुनाचे सत्र सुरु असून आज बुधवार (दि.२) सकाळी ६ वाजेच्या सुमारास बजाजनगरातील एस.टी.कॉलनीत एका अनोळखी महिलेचा अर्धनगन्न हात बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. मारहाण करुन खून केल्यानंतर महिलेचा मृतदेह परिसरात टाकून मारेकरी फरार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, बजाजनगरातील एसटी कॉलनीत आज बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दत्तात्र्य पांढरे यांना अनिल वऱ्हाडे व अतुल राणे यांच्या घरासमोर एक अनोळखी महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार, सहा.पोनि.मदनसिंग घुनावत यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्या अनोळखी महिलेच्या अंगावर असलेली साडी बाजुला काढली असता तिचे दोन्ही हात ओढणीने बांधलेले तसेच चेहऱ्यावर मारहाणीच्या खुना दिसून आल्या. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे.दरम्यान, पोलिसांनी महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. तसेच सीसीटीव्हीच्या मदतीने मारेकऱ्यांची अधिक माहिती घेतली जात आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणीसहायक पोलिस आयुक्त विवेक सराफ, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पोनि. प्रशांत पोतदार, गुन्हे शाखेचे निरीक्षक, अविनाश आघाव, उपनिरीक्षक विठ्ठल चास्कर, अमोल देशमुख आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नागरिकांसोबत चर्चा केली. श्वान व फॉरेन्सिंगच्या लॅबच्या पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वान टिपू हा घटनास्थळीच घुटमळल्याने मारेकरी वाहनातून पसार झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या प्रसंगी श्वान पथकाचे एम.एम.तनपुरे, ए.व्ही.मोरे, ए.के.महेर आदींची उपस्थिती होती.