औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात व्यापक प्रमाणात लसीकरण सुरू करण्यात आले. लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोन जण पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरित दोन्ही रुग्णांच्या लाळेचे नमुने पुन्हा तपासणीसाठी घाटीच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
शहरात कोरोना झपाट्याने वाढत चालला आहे. मंगळवारी शहरात २८३ रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. रुग्णसंख्या कमी व्हावी यासाठी महापालिकेकडून व्यापक उपाययोजनाही सुरू आहेत. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण हाती घेण्यात आले. आता १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजारांनी ग्रस्त नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरणाला नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. शहरात कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोघेजण पॉझिटिव्ह निघाल्याचे समोर आले आहे. या दोघांचे डोस पूर्ण होऊन चार ते पाच दिवस झाले आहेत. त्यांना त्रास जाणवत असल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या प्रकारामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.
१५ दिवसांनी अॅन्टीबॉडीज तयार होतातकोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही शहरात दोघेजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या दोघांचेही लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवले जाणार आहेत. मात्र, शंका आल्यामुळे दोघांची आरटीपीसीआर टेस्ट केली. त्यामध्ये त्यांच्यात सौम्य लक्षणे आढळली आहेत. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर साधारणपणे १५ दिवसांनी अॅन्टीबॉडीज तयार होतात. लस घेतल्यावरही मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे हे नियम पाळावेच लागतील.- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.