सोयगाव : घरात घुसून कोल्ह्याने झोक्यात झोपलेल्या बालिकेवर झडप घालून उचलले. मात्र पालकांनी वेळीच प्रतिकार केल्याने कोल्ह्याने तेथून पलायन केले. मात्र यात बालिकेच्या पोटावर गंभीर जखम झाली आहे. यानंतर मंगळवारी सकाळी आणखी तीन बालकांना या कोल्ह्याने शिकार करण्याचा प्रयत्न केल्याने निंबायती ( ता.सोयगाव ) गावात खळबळ उडाली आहे.
डोंगर रांगांतून भरकटून आलेल्या कोल्ह्याने निंबायतीगावात सोमवारी सायंकाळी प्रवेश केला. गावात एका घरातील झोक्यात झोपलेल्या उमैय्या जुनेद तडवी (३) या बालिकेवर झडप घालत तिला उचलले. दरम्यान, पालक जागे झाले आणि त्यांनी मोठ्या शर्थीने कोल्ह्याला हुसकावून लावले. मात्र कोल्ह्याने पोटाला चावा घेतल्याने बालिका गंभीर जखमी झाली आहे. यानंतर मंगळवारी सकाळी अंगणात खेळणाऱ्या फैजाब अकिल तडवी (वय १४), अक्सद मुक्तार तडवी(वय १३), रसूल उसुफ तडवी(वय २२) यांना कोल्ह्याने कडाडून चावा घेतला. यानंतरही कोल्ह्याचा निंबायती गावात धुमाकूळ सुरुच होता. काही ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्यांनी हुसकावले असता कोल्हा गावालगतच्या कपाशीच्या शेतात पळाला. वनविभागास याची माहिती मिळताच एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावालगत जाळे लावले असून कोल्हा पकडण्यात अद्याप यश आले नाही. दरम्यान, जखमींवर जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या पवार, अलकाबाई लिमकर यांनी उपचार केले.
गावात कोल्ह्याने प्रवेश केल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. कोल्ह्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी मस्तान तडवी, अकिल तडवी, जमील तडवी, जाकीर तडवी, माजी सरपंच शमा तडवी, तोसीफ शेख, अमीन तडवी आदींनी केली आहे. वनविभागाच्या वनरक्षक माया झिने, वनमजूर गोविंदा गांगुर्डे आदी कर्मचाऱ्यांचे पथक गावात ठाण मांडून आहे.