औरंगाबाद: नवा मोंढा जाधववाडीतील जनरल व्यापार संकुलाच्या छतावर अनोळखी ४० वर्षीय व्यक्तीचा सिमेंट गट्टुने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७:४५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी सिडको ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुध्द खूनाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला.
प्राप्त माहितीनुसार, नवा मोंढा जाधववाडी येथील जनरल व्यापारी संकुलाच्या छतावर नेहमीप्रमाणे आज सकाळी ७:४५ वाजेच्या सुमारास काही लोक लघुशंका करण्यासाठी गेले. तेव्हा तेथे अनोळखी व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला असल्याचे पाहून तीन ते चार जण दुरवरच उभे राहिले. सुरक्षारक्षक कंपनीचे कार्यालय तेथेच असल्यामुळे सुपरवायझर दिलीप सुरेश बोर्डे हे तेथे गेले असता त्यांनी हा खुनाचा प्रकार असल्याचे दिसले. त्यांनी लगेच पोलीस उपनिरीक्षक एकनाथ इंगळे यांना ही घटना कळविली. इंगळे यांनी सिडको पोलीस ठाण्याला याविषयी माहिती दिली. यानंतर पोलीस उपायुक्त दिपक गिऱ्हे, पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सहाय्यक निरीक्षक सुनील अरबाड, फौजदार बाळासाहेब आहेर, आणि गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सिमेंट गट्टु मारून ठेचले डोकेमारेकरी आणि मयत हे परस्परांच्या ओळखीचे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. गांजाच्या गोळ्या, पाण्याची बाटली तेथे आढळून आली. कदाचित नशा पाणी करण्यावरून झालेल्या वादात जवळच पडलेला सिमेंट गट्टू मारून हा खून करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. मयताची ओळख पटलेली नाही. ओळख पटल्यावर तसेच आरोपी पकडल्यावर खूनाचे कारण कळू शकेल.