उदगीर : उदगीर येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यास ३ हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले़ नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी त्याने ही लाच स्वीकारली होती़उदगीर महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातंर्गत देवणी, जळकोट, अहमदपूर, चाकूर व उदगीर तालुक्यांचा समावेश आहे़ त्याअनुषंगाने या तालुक्यातील महावितरणच्या कामासाठी नागरिकांनी उदगीर गाठावे लागते़ अशाच एका कामासाठी चाकूर येथील फिर्यादी कार्यकारी अभियंता एस़सी़ ठवरे याच्याकडे चकरा मारत होता़ जमीन अकृषी करण्यासाठी लागणारे महावितरणचे नाहरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी फिर्यादीने कार्यकारी अभियंत्याकडे अर्ज केला होता़ मात्र, एस़सी़ ठवरे याने फिर्यादीकडे हे प्रमाणपत्र देण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केली होती़ मात्र, फिर्यादीस ही रक्कम द्यावयाची नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़ या विभागाने लाच मागतिल्याची खात्री केल्यानंतर सोमवारी उदगीरच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात सापळा रचला़ सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीने ठरल्याप्रमाणे ५ हजारांतील ३ हजार रुपये लाचस्वरुपात अभियंता एस़सी़ ठवरे याला देवू केली़ याचेवळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ठवरे याला लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले़ याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़तीन महिन्यांतच गूल़़़कार्यकारी अभियंता एस़सी़ ठवरे याला उदगीर येथील पदभार घेऊन अद्याप तीन महिनेही पूर्ण झाले नाहीत़ तो ११ मार्च रोजी येथे रुजू झाला होता. त्याच्या कार्यकाळाला अजून तीन महिनेही पूर्ण होत नाही, तोच लाचलुचपतच्या जाळ्यात त्याला अडकावे लागले़ दरम्यान, ठवरे हा उदगीरला रुजू होण्यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे कार्यरत होता. तेथेही त्याच्यावर गैरकारभारामुळे निलंबनाची कार्यवाही झाली होती़ निलंबन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याला महावितरणने उदगीर येथील पदभार दिला होता़
कार्यकारी अभियंता लाच घेताना गजाआड
By admin | Published: June 07, 2016 12:00 AM