रमेश कोतवाल , देवणीतालुक्यातील मांजरा नदीतील अवैध वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने मांजरा नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. बारा गावांतून मांजरा नदी वाहते. यापैकी निम्म्या गावाला एका बाजूस महाराष्ट्र तर दुसऱ्या बाजूस कर्नाटक राज्याची सीमा आहे. बारा गावांपैकी बटणपूर, विजयनगर, लासोना, सिंधीकामठ, जवळगा, माटेगडी व टाकळी, धनेगाव या गावांतील वाळूचे साठे हे अधिकृतपणे शासनाने लिलाव केले आहेत. तर इतर बाकीच्या गावांमध्ये हे साठे अनधिकृत आहेत. या गावच्या नदीपात्रातील वाळू किती ब्रास काढायची व मूळ नदीपात्र अबाधित राहील, या अटीवर छोट्या मशीनने व मनुष्यबळाने मर्यादित वाळूसाठा उपसा करण्याचा लेखी करार करून सवाल सोडण्यात आले असतानाही या वाळूसम्राटांनी अवैध मार्गाने सर्व नियम बाजूला सारून मोठ मोठ्या मशीनने व यांत्रिकी बोटीच्या साह्याने लाखो ब्रास वाळूचा उपसा केला आहे. हा उपसा दिवस-रात्र सुरू आहे. अवजड यंत्राने व बोटीने नदीपात्रात मोठे खोदकाम करून वाळू उपसा केल्याने बटनपूर, लासोना, विजयनगर, सिंधीकामठ या गावाला तर नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी, नदीपात्र नामपात्र राहिले आहे. बटनपूर, विजयनगर, लासोना, सिंधीकामठ येथे एक उच्चस्तरीय बंधारा आहे. मात्र या वाळूमाफियांनी या बंधाऱ्यातील पाणी, वाळू उपसा करण्यासाठी दोन महिन्याअगोदरच दारे खुले करून सोडून दिले आहेत. त्यामुळे या भागातील जवळपास २ हजार एकर उसावर पाण्याचा मोठा परिणाम झाला आहे. कर्नाटक सरकारची हद्द या गावाच्या दुसऱ्या बाजूला येते. त्या बाजूने कर्नाटक सरकार व वाळूमाफियांनी मिळून आपल्या हक्कासह महाराष्ट्राच्या हद्दीतील वाळूही मोठ्या प्रमाणात उपसली आहे. या दोन राज्यांच्या सीमावादात चार गावच्या हद्दीतील मांजरा नदी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. बीदरच्या पाणीपुरवठ्यासाठी नारंजा प्रकल्पातून कर्नाटक सरकारने पाणी सोडल्याने या चार गावांतील उसाला जीवदान मिळाले आहे. मात्र आजही रात्रं-दिवस वाळूउपसा चालूच आहे. दोन राज्यात मिळून दररोज हजार-दीड हजार ब्रास वाळूूउपसा केला जात आहे. या चार गावानंतर धनेगाव, जवळगा, माटेगडी, टाकळी आदी गावांच्या नदीपात्रातून अवजड यंत्र व बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा चालू आहे. परिणामी, या ठिकाणच्या मांजरा नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याबाबत तहसीलदार अहिल्या गाठाळ म्हणाल्या, तालुक्यात अवैैध वाळू उपसा जिथे चालू आहे, तिथे कारवाई करण्यात येईल़तालुक्यात वाळूउपसा मोठ्या प्रमाणात होत असतानादेखील प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. एखाद्यावेळेस झालीच तर कारवाई नाही तर हजार-दोन हजार रुपये दंडापर्यंतची कारवाई करून पुन्हा त्या व्यवसायाकडे दुर्लक्ष केले जात आहे. मांजरा नदी व्यतिरिक्त देव नदी, मानमोडी नदीत पण कमी-अधिक प्रमाणात अवैध वाळूउपसा केला जात आहे. परवानगी मर्यादित जणांना, उपसा मात्र मोठ्या संख्येने केला जात आहे.४सध्या देवणी तालुक्यातील विजयनगर, बटनपूर, लासोना, बोरोळ, सिंधीकामठ, धनेगाव, जवळगा, टाकळी, हेळंब आदी बारा गावांमध्ये वाळूमाफियांनी हजारो ब्रासचे ढिग गोळा करून अवैध मार्गाने साठवून पावसाळा व हिवाळ्यात जास्तीच्या किंमतीने विक्री केले जातात. असे अवैध वाळूचे साठे तालुका प्रशासनाला कसे दिसत नाही. वाळू उपशाची लेखी परवानगी घेणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. परंतु, वाळूउपसा करून ढिग लावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे देवणी तालुक्यातील अनेक गावांत असलेले अवैध वाळूसाठे जप्त करून शासनाच्या महसुलीत वाढ करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
मांजरा नदीचे अस्तित्व धोक्यात!
By admin | Published: June 12, 2014 12:49 AM