छत्रपती संभाजीनगर: पहिल्या व दुसऱ्या पावसात किरकोळ वाऱ्याने विदेशी झाडे मुळासकट उन्मळून पडत आहेत. वादळी पावसात शहरवासियांना हा अनुभव पुन्हा आला. शिरीष, काशिद, गुलमोहर ही विदेशी जातींची झाडेच अधिक उन्मळून पडत आहेत.
बुधवारच्या पावसात कडा कार्यालय, झांबड इस्टेट, विश्वभारती कॉलनी, चौसर भागातील झाडे पडली. त्यामुळे रस्ते बंद झाले व विजेच्या ताराही तुटल्या. अग्निशामक विभाग आणि महावितरणचे कर्मचारी या झाडांच्या फांद्या कापून त्यांना रस्त्यावरून बाजूला करत होते. ऑक्सिजन देणारी स्वदेशी झाडांची लागवड न करता शहरात विदेशी झाडे गुलमोहर, निलमोहर, काशिद, परदेशी शिरीष, किजेलीया, सुबाभूळ, निलगिरी, पाल्मट्री अशी बहुतांश विदेशी झाडे लावण्यात आलेली आहेत.
त्या झाडांची मुळे खोलवर जमिनीत घट्ट रुतलेली नसल्याने ही झाडे जोरदार हवेत स्वत:चाही बचाव करू शकत नाहीत. विश्वभारती कॉलनीत काशिदचे झाड पडले तर हेडगेवार रुग्णालय व झांबड इस्टेट येथे शिरीषचे झाड पडल्याचे अभ्यासकांनी सांगितले. अशा झाडांखाली सावलीत किंवा पावसात स्वत:ला वाचविण्यासाठी आडोसा घेणेही धोकादायक ठरते.
स्वदेशी झाडे सहज पडत नाहीतवडाच्या झाडाच्या पारंब्याला आधार दिला तर ते झाड कित्येक वर्षे टिकते. विदेशी झाडांना कुणीही वृक्षारोपणात वापरू नका.डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव सदस्य, निसर्गप्रेमी