औरंगाबाद : भारतात तंत्रज्ञानाची प्रगती होत आहे, त्यामुळे जर्मनीतील गुंतवणूक वाढत आहे. यामुळेच आम्ही नागपूर येथे मेट्रोत गुंतवणूक करीत आहोत. तसेच नाशिक,पुणे आणि ओडिशा, तामिळनाडूत गुंतवणूक वाढविणार असल्याचे प्रतिपादन जर्मन कौन्सिलेटचे राजदूत डॉ. यूरगन मोरहार्ड यांनी केले.
चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर, नॅसकॉम आणि ई-सी मोबिलिटीतर्फे आयोजित स्मार्ट मोबिलिटी कॉन्फरन्सचे उद्घाटन डॉ. मोरहार्ड यांच्या हस्ते मंगळवारी जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये झाले. यावेळी ते बोलत होते, व्यासपीठावर सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, ई-सी मोबिलिटीचे संचालक प्रशांत देशपांडे, नॅसकॉमचे संचालक प्रसाद देवरे, जर्मन कंपनी ईसीएम सी-मोर आॅटोमोटिव्ह या कंपनीचे एमडी ग्रेगॉर मेटॅनर यांची उपस्थिती होती.
मोरहार्ड म्हणाले, औरंगाबादेत आज ईसी ग्लोबलसोबत सामंजस्य करार केले आहेत. भारतीय टेक्नॉलॉजी, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, सर्वच क्षेत्रात वापर होत असलेले स्मार्टनेस आता आॅटोमोटिव्ह क्षेत्रातही दिसून येत आहे. ग्रेगॉर मेटॅनर म्हणाले, जर्मन किती टेक्नॉलॉजीच्या बाबतीत पुढे असले तरी आता काळ बदलतोय, टॅलेंटला जगात मान्यता आहे. भारतातील टेक्नॉलॉजी, आॅटोमोटिव्ह क्षेत्र, मेकॅनिकल क्षेत्र आणि त्याला मिळालेली ई-मोबिलिटीची साथ यामुळे आम्ही भारताकडे आशेने पाहत आहोत.
सीएमआयएचे अध्यक्ष कोकीळ म्हणाले,अनेक क्लस्टर्स येथे होत आहेत. ब्रुमपासून ते इलेक्ट्रॉनिक, आॅटो, गारमेंट अशी कितीतरी क्लस्टर येथे झाली आहेत. जर्मन कंपन्यांनी विस्तारीकरणाचा विचार करताना महाराष्ट्रातील औरंगाबादचाच यापुढे विचार करावा. या कॉन्फरन्सला १५० हून अधिक कंपन्या, कॉलेज व नामांकित संस्थांचे मान्यवर उपस्थित होते.
जर्मन कपन्यांसोबत करारात वाढ ई-मोबिलिटी क्षेत्रात काम करत असलेल्या पुण्यातील कंपनीचे संचालक एम.आर.सराफ म्हणाले, भारत जर्मन कंपन्यांसोबत विविध करार करीत आहे. ई-मोबिलिटी म्हणजे ड्रायव्हरलेस कार नसून आॅटोमोबाईलमध्ये आयटी आणि टेक्नॉलॉजीच्या जोरावर सूक्ष्म, अतिसूक्ष्म आधुनिकता आणून देणे आहे. स्मार्ट मोबिलिटी या विषयावरील बारकावे, त्यातील बदल, जगापुढील आव्हाने आणि एकंदरीत सूक्ष्म विषयांवर तांत्रिक चर्चासत्रात मान्यवरांनी मार्गदर्शन केले.