सध्या राज्यात ४८ रेल्वे मार्ग सर्वेक्षणात असून, यातील केवळ ३ मार्गांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. येत्या अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गाला मान्यता मिळविण्यासाठी सखोल माहिती व आकडेवारीनुसार हा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे मान्यतेसाठी सुपूर्द करण्यात येणार आहे.
औरंगाबाद व नगरच्या चार तालुक्यांतून हा मार्ग जाणार असल्याने त्या अनुषंगाने उद्योजक, शेतकरी व व्यापाऱ्यांचे मत जाणून घेण्यात आले. सध्या वाळूज औद्योगिक वसाहतीतून दिवसाला ३०० कंटेनर माल वाहतूक होते, तर औरंगाबाद-पुणे महामार्गावर अंदाजे रोज आठशे महामंडळाच्या, तर दोनशेच्या आसपास खाजगी प्रवासी गाड्या धावतात, अशी माहिती उपस्थित अधिकारी व नागरिकांनी या सर्व्हे समितीला दिली आहे. याव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात शेती मालाची वाहतूकदेखील परिसरातून केली जाते, या मार्गावर कायगाव, देवगड व शनिशिंगणापूर देवस्थान असल्याने याचा फायदादेखील रेल्वेला होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.
मध्य रेल्वेचे डेप्युटी चीफ ऑपरेटिंग मॅनेजर (सर्व्हे) सुरेशचंद्र जैन यांच्या नेतृत्वाखाली रवी गुजराल, मुकेश लाल हे या सर्व्हेचे काम पाहत आहेत. याप्रसंगी खा. डॉ. भागवत कराड, किशोर धनायत, नगरसेवक प्रदीप पाटील, तहसीलदार अविनाश शिंगोटे, व्यापारी महासंघाचे शरद गांधी, विष्णुपंत पोळ, प्रवीण पारख, दीपक साळवे, सतीश बारे, राजेंद्र राठोड, भारत पाटील, वाजीद कुरेशी, तसेच गंगापूर व लासूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी, आगार प्रमुख, शहरातील व्यापारी, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.