लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘अनुभव अधिक अनुभूती अधिक साक्षात्कार प्रकट करणे म्हणजे साहित्य होय. केवळ अनुभव प्रकट करणे म्हणजे साहित्य नव्हे,’ अशी भूमिका मांडत अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी श्रेष्ठ दर्जाच्या सहित्यनिर्मितीची अपेक्षा केली.ते मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. ना.गो. नांदापूरकर सभागृहात मसापच्याच साहित्य पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी डॉ. नागनाथ कोत्तापल्लेलिखित ‘लक्षणीय असे काही’ला नरेंद्र मोहरीर वाङ्मय पुरस्कार, उदगीरचे प्रसाद कुमठेकरलिखित ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ला नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार, औरंगाबादचे कैलास इंगळेलिखित ‘वाङ्मयीन मराठवाडा’ला म.भि. चिटणीस वाङ्मय पुरस्कार, नांदेडचे पी. विठ्ठललिखित ‘शून्य एक मी’ला कुसुमावती देशमुख वाङ्मय पुरस्कार, कोल्हापूरचे प्रा. कृष्णात खोतलिखित ‘रिंगाण’ला बी. रघुनाथ पुरस्कार, वसईचे राजीव नाईकलिखित ‘लागलेली नाटकं’ला कुमार देशमुख नाट्य पुरस्कार आणि नांदेडचे निर्मलकुमार सूर्यवंशी यांना पुस्तक व्यवहारातील लक्षणीय कामगिरीकरिता रा.ज. देशमुख स्मृती पुरस्कार देऊन डॉ. काळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यापैकी राजीव नाईक हे अनुपस्थित राहिले. उर्वरित सहा जणांनी या पुरस्काराबद्दल आपले मनोगत व्यक्त केले व पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्तकेला.प्रारंभी, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शेषराव मोहिते व डॉ. जयद्रथ जाधव (लातूर) यांनी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या साहित्यावर भाष्य केले.रामचंद्र काळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. रा.रं. बोराडे, प्रा. जयदेव डोळे, डॉ. दादा गोरे, सुलभा मुंडे, वीरा राठोड, डॉ. समाधान इंगळे, डॉ. दासू वैद्य आदींसह साहित्य क्षेत्रातील मंडळी यावेळी उपस्थित होती.
दर्जेदार साहित्यनिर्मितीची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 1:20 AM