गोकुळ भवरे, किनवटएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवटअंतर्गत २०१३-१४ या वर्षात ७ कोटी ७० लाख रुपये किमतीच्या ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा एकात्मिक कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील पाच तालुक्यांसाठी निधी मंजूर केला़ पण ३ कोटी ६६ लाख रुपयेच प्रत्यक्षात खर्च करण्यात आल्याची माहिती आहे़ १० ग्रामपंचायतींनी मात्र कामांना सुरुवातच केली नसल्याने आदिवासी विकासाचा निधी खर्च करण्यात ग्रामपंचायतींची उदासीनता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे़पिंपळगाव (कि़), डोंगरगाव, कोलामगुडा, लिमगुडा, मिनकी, पाटोदा (चि़), मांजरीमाथा, अप्पारावपेठ, तलाईगुडा व जिरोना या दहा ग्रामपंचायतीने प्रस्तावच सादर केला नसल्याने मंजूर रक्कम अद्यापही अखर्चित आहे़ तर उर्वरित ग्रामपंचायतींनी मंजूर निधी नाममात्र खर्च केल्याचे प्राप्त माहितीवरून दिसून येते़ याबाबत प्रकल्प अधिकारी डॉ़अभिजित चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता पंचायत समितींच्या बीडीओंना यापूर्वीच पत्र पाठविले आहे़ निधी शिल्लक आहे, तो खर्च करा, लवकरात लवकर मंजूर करून २०१३-१४ वर्षातील कामे संपवली नाही तर सन २०१४-१५ वर्षात या योजनेसाठी खर्च करण्यास उदासीनता दाखवणाऱ्या गावांना प्राधान्य दिले जाणार नाही, असे डॉ़ चौधरी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़ठक्कर बाप्पा आदिवासी सुधार योजना ही प्रभावीपणे राबवण्यास यंत्रणांची उदासीनता तर आहेच, पण काही कामांना दर्जाही नसल्याची बाब पुढे येत आहे़आदिवासी विकास प्रकल्पाला स्वतंत्र अभियंता नसल्याने ही योजना सुरू झाल्यापासूनच या योजनेची वाट लागली आहे़ यापूर्वी तर चक्क गुत्तेदारी पद्धतीने कामे करून थातूरमातूर कामे करून चांगभले करून घेतले़ याची चौकशी झाली तर कामात झालेली अनियमितता उजेडात येईल, हे विशेष़१२३ कामांना ७ कोटी ७० लाख मंजूृरआदिवासी विकासाच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी किनवट येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कार्यान्वित आहे़ किनवटसह माहूर, हदगाव, हिमायतनगर व भोकर या पाच तालुक्यात ५० टक्क्यांच्यावर आदिवासी लोकसंख्या असलेल्या गावांत टीएसपी व ओटीएसपी अंतर्गत ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा एकात्मिक कार्यक्रमअंतर्गत २०१३-१४ या वर्षात १२३ कामांना ७ कोटी ७० लाख रुपयांची मंजुरी दिली़ सिमेंट काँक्रेट रस्ता, सिमेंट काँक्रेट नाली, सांस्कृतिक सभागृह, सिमेंट काँक्रेट नाली व रस्ता सार्वजनिक शौचालय, शाळा संरक्षण भिंत, पाणीपुरवठा, विहीर व टाकी जोडरस्ता, वाचनालय बांधकाम, व्यायामशाळा बांधकाम, स्मशानभूमी यासारखी कामे पंचायत समितीच्या मार्फत ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली़ ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेच्या काही कामात ग्रामपंचायतीव्यतिरिक्त इतर व्यक्तींचा हस्तक्षेप व पंचायत समितीची उदासीनता यामुळे ही योजना अशीतशीच राबविली जात आहे - प्रा़विजय खुपसे, प्रकल्पस्तरीय आढावा समिती, अध्यक्ष, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवट़
खर्च साडेतीन कोटी
By admin | Published: July 30, 2014 12:55 AM