औरंगाबाद : महापालिकेतील कायम कर्मचाऱ्यांसह कंत्राटी, बचत गटांमार्फत काम करणाऱ्यांचे वेतन तीन-तीन महिने थकत असल्याने १ मेला कामगार दिन शोषण दिन म्हणून साजरा करण्याचा इशारा कामगार शक्ती संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
महापालिका काही वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. त्यामुळे जीएसटीचे अनुदान प्राप्त झाल्यानंतरच कर्मचारी-अधिकाऱ्यांचे वेतन केले जाते. दैनिक वेतनावरील तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मात्र हाल होत आहेत. आजघडीला हजारो कंत्राटी कर्मचारी महापालिकेत काम करतात. त्यांना अनेकवेळा लेखा विभागात बिले उशिराने दाखल झाल्यामुळे तर कधी निधीअभावी वेतन मिळत नाही. तीन-तीन महिने वेतन थकल्यामुळे कोरोनाकाळात त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत देण्यात यावे, अशी मागणी कामगार शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात यांनी केली आहे.
रेल्वेस्टेशन, विमानतळावर १९ पॉझिटिव्ह
औरंगाबाद : रेल्वेस्टेशन आणि विमानतळावर शनिवारी ८५ प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात आली. शुक्रवारी ८२ प्रवाशांची तपासणी केली होती. त्यातील तब्बल १९ जण आज पॉझिटिव्ह आढळून आले. शनिवारी ज्या प्रवाशांची तपासणी केली त्यांचा अहवाल महापालिकेला रविवारी सकाळी प्राप्त होईल.