मुजीब देवणीकर
औरंगाबाद : शहरात कोरोनाने थैमान घातले असून सध्या शहरातील रूग्णालयांमध्ये उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या ५ हजारांपर्यंत पोहोचली आहे. अवघ्या १० दिवसांमध्ये दीड हजारांपेक्षा जास्त रूग्ण रूग्णालयात दाखल झाले आहेत. एकीकडे रूग्णसंख्येचा स्फोट होत असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत बहुतांश नागरिक बेफिकीर होऊन मास्कविना फिरत आहेत.
महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत अनेक उपाययोजना केल्या आहेत. शहरात अजूनही समूह संसर्ग होण्यासासरखी परिस्थिती निर्माण झालेली नाही. मात्र मागील मागील १० दिवसांपासून लक्षणीय प्रमाणात वाढलेली रूग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे.
दि. १ सप्टेंबर रोजी उपचार सुरू असणाऱ्या कोरोना रूग्णांची संख्या २ हजार ९७९ होती. दि. २१ रोजी ही संख्या ४ हजारांच्या पुढे गेली आहे. खाजगी रूग्णालयांमध्ये आता २०० पेक्षा अधिक आयसीयू बेड वाढविण्यात आले आहेत. मागील एक महिन्यापासून विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर मनपा प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. विनामास्क रस्त्यावर दिसणाऱ्या लोकांना प्रत्येकी ५०० रूपये दंड आकारण्यात येत असून यातून मनपा दररोज ५० हजारापर्यंत दंड वसूल करत आहे. तरीही मास्क न वापरणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होत नाही, असे चित्र सध्या शहरात दिसत आहे.