- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: तालुक्यातील माणिकनगर (भवन) येथे बोगस सोयाबीन बियाणे व किटनाशक बनविणाऱ्या कंपनीवर कृषी विभागाने सापळा रचून छापा टाकला. यावेळी १०७ पिशव्या बनावट सोयाबीन बियाणे आणि कीटकनाशके, कीटकनाशकाचे लेबल, तसेच बनावट कीटकनाशके आणि बियाणे बनवण्यासाठी लागणारी सामग्री जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली. या प्रकरणी मुख्य आरोपी मात्र पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. आरोपीने मराठवाडा, खान्देश, विदर्भात ९०० पिशव्या बनावट सोयाबीन बियाणे विकले आहे, यामुळे खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद तालुक्यातील मौजे बेंबळेवाडी या गावातील शेतकरी प्रल्हाद मोतीराम बहुरे यांनी ( पावती क्रमांक 0123 दिनांक 10/ 6 /2020 नुसार सोयाबीन के 228 या वाणाच्या लॉट क्रमांक 0077 च्या ) दोन बॅग वरील कंपनीच्या खरेदी केल्या होत्या. परंतु या दोन्ही बॅगमधील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी औरंगाबाद पंचायत समितीला केली होती. तेथील कृषी अधिकाऱ्यांच्या पहाणीमध्ये मे.किसान ॲग्री टेक्नॉलॉजी प्रा.ली.,नावाची कंपनी बीड बायपास येथे अस्तित्वात नसल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांना माहिती दिली. सदरील बियाणे पावतीवरील व बॅगवरील उत्पादकाचा पत्ता भवन तालुका सिल्लोड येथील असल्याचे आढळुन आले. यावरून गंजेवार यांनी सिल्लोड पंचायत समितीचे गुणनियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी संजय व्यास यांना याकामी संपूर्ण तपास करण्याचे आदेशीत केले.
मंगळवारी ७ जुलै रोजी विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद डी.एल जाधव यांचे आदेशान्वये डॉ. तुकाराम मोटे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी औरंगाबाद व आनंद गंजेवार कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली कृषी अधिकारी संजय व्यास यांनी विभागीय स्तरावरील भरारी पथकाचे तंत्र अधिकारी प्रशांत पवार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय औरंगाबाद, संजय हिवाळे मोहिम अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद, दिपक गवळी तालुका कृषी अधिकारी सिल्लोड, पाडळे मंडळ कृषी अधिकारी, शैलेश सरसमकर व विश्वास बनसोडे विस्तार अधिकारी (कृषि), कृषी सहाय्यक कस्तुरकर यांनी माणिकनगर, भवन येथील बेग मिर्झा बेग याच्या दुकान व व्यवसाय घर क्रमांक 22 येथे संध्याकाळी ५ वाजता छापा टाकला.
यावेळी पथकास १०७ बॅग बनावट सोयाबीन बियाणे आढळून आले. ज्याची बाजारभाव [रामाने एकूण किंमत 3,97,500/- रुपये आहे. तसेच बियाणे पॅकिंग करण्यासाठी लागणाऱ्या पॅकिंग बॅग, पायाभूत व सत्यतादर्शक दर्शक बियाण्याचे बनावट टॅग,बिल बुक, पावती पुस्तके, वजनकाटा आढळून आले. तसेच बनावट बियाणांसोबत किटकनाशकाची ऊत्पादन, वितरण व विक्री अवैधरित्या करीत असल्याचे दिसून आले. येथून 7268/- रुपये किमतीचे बनावट कीटकनाशके, कीटकनाशकाचे लेबल, कीटकनाशके बनवण्यासाठी लागणारी सामग्री, इत्यादी साहित्य पथकाने जप्त केले.
याप्रकरणी, सिल्लोड (ग्रामीण) पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी पहाटे गु. र.क्र. 212/ 2000 अन्वये आरोपी तसवर बेग युसूफ मिर्झा बेग ( ३२ ) व त्याची बनावट कंपनी मे.किसान ॲग्री टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ( घर क्रमांक 22, भवन, माणिक नगर, तालुका सिल्लोड ) याविरुद्ध भा. द.वी. 34, 468, 420 , बियाणे अधिनियम 1966, नियम 1968, बियाणे नियंत्रण आदेश 1983, कीटकनाशके अधिनियम 1968 व कीटकनाशके नियम 1971 चे विविध कलमान्वये फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्ररणी मुख्य आरोपी फरार असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण बिडवे हे करत आहेत.
कृषी विभागास माहिती द्यावीशेतकऱ्यांनी बनावट बियाणे, खते व कीटकनाशके कोणी विनापरवाना विक्री करीत असल्यास फसवणूक होण्याची शक्यता आहे. कोणत्त्याही अमिषास बळी न पडता याबाबतची माहिती कृषी विभागास किंवा पोलिसांना द्यावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी केले.
लायसन्स संपले व हा उद्योग सुरू केला..सदर आरोपी या पूर्वी भवन येथे कृषी सेवा केंद्र चालवत होता .त्याच्या दुकानाचा परवाना 2019 मध्ये संपला होता.त्याने परवाना नूतनीकरण न करता दोन वेगवेगळ्या नावाच्या बोगस कंपन्या टाकल्या. बाजारातून साधे सोयाबीन खरेदी करून त्याची विक्री त्याने या बनावट कंपनीच्या नावे सुरु केली. एका शेतकऱ्यांने या बियाण्याचे लेबल सहित लेखी तक्रार केल्याने कृषी विभागाने त्या बोगस कंपनीचा भांडाफोड झाला. - संजय व्यास कृषी अधिकारी प. स. सिल्लोड.
यु ट्यूब वर जाहिरात..सदर आरोपीने यु ट्यूब वर दोन्ही कंपनीच्या नावाने जाहिरात केली होती त्यात बियाणे व किटनाशक बाबत जाहिरात केली होती. यामुळे अनेक दुकानदार व शेतकरी ही जाहिरात बघून त्याच्या जाळ्यात अडकले. शेवटी बिंग फुटल्याने शेतकऱ्यांकडून सोयाबीन न उगल्याची तक्रार सुरू झाली.
९०० पिशव्या बनावट सोयाबीन बियाणे विकलेसदर आरोपीने आतापर्यंत औरंगाबाद, जालना, बुलढाणा, जिल्ह्यातील व मराठवाडा, खान्देश, विदर्भातील यवतमाळ, नंदूरबार, शहादा, चोरमाला, भोकरदन, धावडा, येथील किरकोळ व्यापारी व शेतकऱ्यांना थेट ९०० पिशव्या के 228 नावाचे बोगस सोयाबीन बियाणे विकले असल्याच्या पावत्या कृषी विभागाने जप्त केल्या आहेत. त्याची किंमत जवळपास 33 लाख 75 हजार रुपये होत आहे. 3750 रुपयात तो 25 किलो सोयाबीन बियाणे विकत होता.
हे होते किटनाशकआरोपीने कापूस, मका, मिरची, पिकावर फवारण्यासाठी किसान मिडा, नीम ऍझोल्ड,स्टार पावर,बाऊन फ्लावर अल्ट्रा नावाचे बोगस किटनाशक तयार केले होते. काही किटनाशकाचे रिकामे डबे यावेळी जप्त करण्यात आले आहेत.