औरंगाबाद : फुलंब्री पंचायत समितीअंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी एकनाथ भोसले यांना ३ हजार रुपयांची लाच घेताना अॅन्टी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी दुपारी फुलंब्री येथील गटविकास अधिकारी कार्यालयात करण्यात आली.प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार हे फुलंब्री तालुक्यातील संदेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या पद्मावती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत आहेत. या महाविद्यालयाचे यू-डीआयएसई हे प्रमाणपत्र मिळावे म्हणून त्यांनी गटशिक्षण विस्तार अधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला. अर्जानुसार त्यांचे काम शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी भोसले यांच्याकडे असल्याचे त्यांना समजले. तेव्हा त्यांनी त्यांची भेट घेतली असता भोसले यांनी प्रमाणपत्राकरिता ३ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अॅन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार नोंदविली. २९ डिसेंबर रोजी पंचासमक्ष भोसले यांनी त्यांच्याकडे पुन्हा लाचेची मागणी केली आणि ३ हजार रुपये कार्यालयात आणून देण्यास सांगितले. त्यावरून साध्या वेशातील पोलिसांनी गटविकास अधिकारी कार्यालयात सापळा रचला. तेथे दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून ३ हजार रुपये लाच घेतल्यानंतर रंगेहाथ पकडण्यात आले.हा सापळा यशस्वी करण्यासाठी औरंगाबाद परिक्षेत्राचे प्रभारी पोलीस अधीक्षक संजय नेकलीकर, उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, रामनाथ चोपडे, कर्मचारी श्रीराम नांदुरे, सुनील फेपाळे, सचिन शिंदे, नितीश घोडके, चालक संदीप चिंचोले यांनी पुढाकार घेतला. आरोपीच्या विरोधात फुलंब्री ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.४फुलंब्री तालुक्यातील शेलगाव येथील शाळेसाठी जि.प.शिक्षण विभागाकडून यू-डीआयएसई हे प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असते. या प्रमाणपत्रासाठी संस्थेच्या प्रस्तावावर निर्णय होत नसल्याने लिपिक यांनी शिक्षणविस्तार अधिकारी भोसले यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी ५ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रुपयांत हे प्रमाणपत्र देण्याची तयारी त्यांनी दर्शविली.
विस्तार अधिकारी लाच घेताना अटक
By admin | Published: December 30, 2014 12:58 AM