औरंगाबाद : बिडकीन येथील ग्रामसेवक संजय शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी शुक्रवारी विस्तार अधिकारी भास्कर साळवे आणि चितेगाव येथील ग्रामसेवक तुळशीराम पोतदार यांचेही निलंबन केले.
शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वप्रथम पैठणचे गटविकास अधिकारी विजय लोंढे यांचा पदभार काढण्यात आला. तर ग्रामविकास अधिकारी व पैठण ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष सखाराम दिवटे यांचे निलंबन गुरुवारी करण्यात आले होते.
बिडकीन ग्रामपंचायत तपासणी करण्याच्या कारणाखाली वारंवार मानसिक त्रास देत पाच लाखांची मागणी केल्याचा आरोप बिडकीन पोलिसांत दाखल तक्रारीत शिंदे यांच्या पत्नी प्रतिभा शिंदे यांनी केला आहे. आरोप झालेल्यांमध्ये पैठण गटविकास अधिकारी विजय लोंढे, ग्रामविकास अधिकारी सखाराम दिवटे, विस्तार अधिकारी भास्कर साळवे आणि चितेगाव येथील ग्रामसेवक तुळशीराम पोतदार यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी कारवाईचा बडगा उचललेला आहे. तर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार पुढील आठ दिवसांत चौकशी पूर्ण होईल. यात आरोप असलेल्या चौघांचीही चौकशी होईल. त्यानंतर चौकशीचा अहवाल तयार करुन ग्रामविकास विभागाच्या सचिवांकडे पाठवण्यात येईल ते पुढील निर्णय घेतील. ग्रामविकास विभागाकडूनही याप्रकरणी विचारणा झाली असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी सांगितले.
पैठणला होईल २७ जानेवारीला चौकशी
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना करण्यात आली असून २७ जानेवारीला पैठण पंचायत समिती येथे या प्रकरणाशी संबंधित ग्रामसेवक, विस्तार अधिकारी पंचायत, सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहायक यांनी आवश्यक त्या पुराव्यासह हजर राहण्याचे आदेश सहायक गटविकास अधिकारी के. एम. बागुल यांना देण्यात आले आहेत. डाॅ. गोंदावले यांनी बागुल यांच्याकडे लोंढे यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला.
---
युनियनने नोंदवले ग्रामसेवकांचे जबाब
ग्रामसेवक युनियन कडून बिडकीन येथे बीडीओ आणि त्यांच्या दलालासंदर्भात असलेल्या ग्रामसेवकांच्या असलेल्या तक्रारी आणि त्यासंदर्भात म्हणणे नोंदवून घेण्यात आले. दहा ते बारा जणांनी जबाब दिले. परंतु गुरुवारी आरोप करणारे शुक्रवारी फिरकले नाहीत. हे जबाब २७ जानेवारीला चौकशी समितीसमोर सादर करणार असल्याचे ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष भीमराज दाणे पाटील यांनी सांगितले.
असे प्रकार खपवून घेणार नाही
बीडीओंवर कारवाईचे अधिकार मंत्रालयीन स्तरावर आहेत. त्यासंबंधीचा चौकशी अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येईल. कर्मचाऱ्यांची कोणत्याही पद्धतीची पिळवणूक आणि संस्थेची प्रतिमा मलिन होईल असे कोणतेही प्रकार खपवून घेतले जाणार नाही. ग्रामसेवक शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणात आरोप असलेल्या तिघांचेही निलंबन केले आहे. बीडीओंचाही पदभार काढला आहे.
- डाॅ. मंगेश गोंदावले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरगाबाद