औरंगाबाद : जिल्ह्यातील ६०३ शाळांत ३६२५ मोफत प्रवेशासाठी आरटीईची २०२१-२२ साठी प्रवेश प्रक्रिया ३ मार्चपासून सुरू झाली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ११ ते १५ मार्चपर्यंत ओटीपी येत नव्हता. तांत्रिक समस्या दूर होईपर्यंत अर्ज भरू नयेत, असे आवाहन पालकांना शिक्षण विभागाने केले होते. आता ती अडचण दूर झाली असून २१ मार्चपर्यंत असलेली मुदत वाढवून ३० मार्च करण्यात आली आहे.
खासगी शाळांतील २५ टक्के जागांवर आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेतून मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यान्वये प्रवेश देण्यात येतात. त्यासाठी ३ ते २१ मार्चपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, ९ हजार ७५१ अर्ज आतापर्यंत करण्यात आले. ११ ते १५ मार्चपर्यंत ओटीपीच्या तांत्रिक अडचणी होत्या. आता ती अडचण दूर झाल्याने अर्ज करण्याची सूचना शिक्षण विभागाने केली असून ३० मार्चपर्यंत आरटीईतून प्रवेशासाठी पालकांना अर्ज करता येणार आहे.