सोयगाव (औरंगाबाद ) : कोल्हापुरी बंधाऱ्यावरील एका नर बिबट्याचा मृत्युनंतर गुरुवारी पुन्हा जरंडी ( ता.सोयगाव ) शिवारात एका शेतात(मादी) बिबट्या अत्यवस्थ अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, युद्ध पातळीवरील उपचार मोहीम राबवल्याने मादी बिबट्याला वाचविण्यात वनविभागाच्या आणि पशुसंवर्धन पथकाच्या यश आले आहे.
जरंडी शिवारातील कोल्हापुरी बंधाऱ्या जवळ नर बिबट्या अत्यवस्थ अवस्थेत आढळल्यावर त्याचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला होता.या घटनेस्थळापासून हजार फुट अंतरावर एका नाल्याच्या जवळ आज पुन्हा मादी बिबट्या अत्यवस्थ असल्याचे गुराख्यांना आढळून आले. घटनेची माहिती सोयगाव वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी राहुल सपकाळ यांनी वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अत्यवस्थ असलेल्या बिबट्याला वनविभागाच्या वाहनात सोयगाव जवळील वेताळवाडीच्या रोपवाटिकामध्ये आणण्यात आले. येथे पशुसंवर्धन पथकाच्या चार वैद्यकीय तज्ञांच्या अधिपत्याखाली चार तास उपचार करण्यात आले. योग्यवेळी उपचार मिळाल्याने बिबट्याला वाचविण्यात वनविभाग आणि पशुसंवर्धन पथकाला यश मिळाले.
बिबट्याची प्रकृती आता नियंत्रणात असल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले. प्रादेशिक सह आयुक्त डॉ,संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय रोग अन्वेषण प्रयोग शाळेचे डॉ.रोहित धुमाळ,तालुका पशुधन अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,डॉ.शाम चव्हाण,डॉ.योगेश पाटील यांनी उपचार केले. याप्रकरणी उपवनसंरक्षक एस.के मंकावार,सहायक उपवनसंरक्षक पुष्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी राहुल सपकाळ,वनपाल गणेश सपकाळ,अनिल पाटील आदींचे पथक पुढील तपास करत आहे.
जरंडी शिवारात मृत झालेल्या बिबट्याचे शवविच्छेदन करून अहवाल औरंगाबाद येथील फोरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहे. गंभीर मादी बिबट्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आल्याने प्रकृती स्थिर आहे.- डॉ.विनोद चव्हाण, तालुका पशुधन अधिकारी सोयगाव