राम शिनगारे, औरंगाबाद : एका व्यापाऱ्याच्या पाच प्लॉटवर कब्जा करीत प्लॉट पाहण्यासाठी गेलेल्या जागा मालकालाच, तुमच्या जागेवर कब्जा केला आहे. ही जागा आम्ही दुसऱ्याला विकणार असल्याचे सांगत, ‘ पाच लाख रुपये द्या अन् प्लॉट घ्या ,’ अशी धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
शेख हसन शेख लाल (रा. कबाडीपुरा, बुढीलेन) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हर्सूल भागात गट नंबर २४९ पार्ट बी येथे त्यांचे पाच प्लॉट आहेत. त्याचे एकूण क्षेत्रफळ ४,९५१ चौरस फूट आहे. या जागेचे मूळ मालक शेख लाल अब्दुल कार व हाजी शेख महेमुद शेख अहेमद यांच्याकडून २४ जुलै १९८७ रोजी खरेदीखत करारनाम्याच्या (रजिस्ट्री नंबर ५९६८) आधारे खरेदी केले. हे पाच प्लॉट १९८७ पासून शेख हसन शेख लाल यांच्या ताब्यात आहेत. या प्लॉटवर त्यांनी कोणतेही बांधकाम केले नाही.
शेख हसन व त्यांची पत्नी हे प्लॉटवर गेले असता, याठिकाणी शेख महेबूब शेख महेमूद, शेख उस्मान शेख महेमुद, शेख सुबान शेख महमूद (रा. जुनाबाजार) आणि शेख हुसेन शेख अकबर (रा. अंबर हिल जटवाडा) यांनी, ‘ प्लॉटवर यायचे नाही ,’ असे बजावले. ‘ तुझ्या प्लॉटची कागदपत्रे आमच्याकडे आहे. आम्ही कधीही तुझे प्लॉट व जमिनीवर कब्जा करून दुसऱ्याला विकणार आहे. तुला जमीन परत पाहिजे असल्यास आम्हाला भेट नाही तर प्लॉट विसर,’ असे सांगितले ; तसेच ‘ प्लॉट पाहिजे असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील,’ असेही सांगून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना १४ डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर अधिक तपास निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक बाबर सय्यद करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"