छत्रपती संभाजीनगर:मराठा आरक्षणासाठी ४२ वर्षीय व्यक्तीने टोकाचा निर्णय घेत जीवन संपविल्याची घटना छत्रपती संभाजीनगरातील लाडसावंगी येथे घडली. बाबासाहेब जनार्धन पडूळ मृताचे नाव आहे. 'हे सरकार मराठा आरक्षण देत नाही,साहिल मला माफ कर' असे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणारे बाबासाहेब जनार्धन पडूळ यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. चिठ्ठीत त्यांनी मनोज जरांगे यांचाही उल्लेख केला आहे.
बाबासाहेब जनार्धन पडूळ हे तालुक्यातील लाडसावंगी येथील रहिवासी असून अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यात एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, असे नमूद केलेले असल्याचे लाडसावंगी येथील डॉ. पंजाबराव पडोळे यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले. तसेच अल्पभूधारक असलेले बाबासाहेब यांच्या मुलाला ९२ टक्के आहेत. मुलाच्या इजिनिअरच्या शिक्षणाचा खर्च भरू शकत नसल्याने नैराशात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पडोळे यांनी दिली.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह आणण्यात आला आहे. येथे मृताचे नातेवाईक आणि मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली आहे. न्याय मिळत नसेल तर मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवू असा इशारा यावेळी मराठा बांधवांनी दिला. महसूल विभागाने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी करत, जमावाने तहसीलदार मूनलोड यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली आहे.
'हे सरकार मराठा आरक्षण देत नाही,साहिल मला माफ कर'बाबासाहेब पडूळ यांनी चिठ्ठीवर एक मराठा लाख मराठा असा उल्लेख केला आहे. 'मागील आठ महिन्यापासून मराठा आरक्षण हे सरकार देत नाही. माझ्या मुलाला १२ वीत ९० टक्के पडले. त्याचे पुढील शिक्षण कसे करेल. तो इतका हुशार असून मी शिक्षण नाही करू शकत. कारण हे सरकार मराठा आरक्षण देत नाही.मला वावर अर्धा एकर.त्यामध्ये कस करू मुलीचे शिक्षण त्यामधी. साहिल मला माफ कर...' असे चिठ्ठीत नमूद केले आहे. साहिल हे त्यांच्या मुलाचे नाव आहे.