काॅंग्रेसमध्ये उत्साही वातावरण, तिकिटासाठी इच्छुकांची गर्दी; वाजतगाजत केले शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 08:03 PM2024-08-13T20:03:45+5:302024-08-13T20:03:56+5:30
अतिआत्मविश्वास नडेल, एकजुटीने व कठोर परिश्रम करून विजय मिळवून देण्याचे नाना पटोले यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर काॅंग्रेसमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. पक्षातर्फे सोमवारी घेण्यात आलेल्या छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत अनेक इच्छुक उमेदवार वाजतगाजत आले व शक्तिप्रदर्शन करून गेले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत असताना एक इच्छुक उमेदवार वाजतगाजत येत होता. ते वाजवणं थांबवा, असे सुचवूनही ते थांबलं नाही. तेव्हा, ‘वाद्य वाजवणं थांबलं नाही तर मी संबंधित उमेदवाराचे तिकीटच कापेन,’ असा दम दिल्यानंतर वाद्य वाजवणं थांबलं आणि नाना पटोले यांना पुढील भाषण करता आलं.
सकाळी पत्रकार परिषदेनंतर जिमखाना क्लबमध्येच आढावा बैठकीसाठी पावसाची काळजी घेत भव्य शामियाना उभारण्यात आला होता. हा शामियाना ओसंडून वाहत होता. कार्यकर्त्यांना खाली बसून भाषण ऐकावे लागले. एकट्या नांदेड जिल्ह्यातून एक हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले असल्याची माहिती पटोले यांनी दिली. याचवेळी नवनिर्वाचित खासदार डॉ. कल्याण काळे व लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांचा सत्कार करण्यात आला. प्रकृती बरी नसल्यामुळे नांदेडचे खासदार वसंत चव्हाण उपस्थित राहू शकले नाहीत.
महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, बंटी पाटील, आरेफ नसीम खान व अमित देशमुख आदींची भाषणे झाली. खा. डॉ. कल्याण काळे यांनी प्रास्ताविक केले. शक्तिप्रदर्शनाला डॉ. जितेंद्र देहाडे यांच्यापासून सुरूवात झाली. कन्नडचे इच्छुक उमेदवार नामदेव पवार हेही समर्थकांसह आले. जालन्याचे आमदार कैलाश गोरंट्याल हे मंचावर उपस्थित होते. पण त्यांचे समर्थक घोषणा देत आले. सुरेश जेथलिया, मंठ्याचे कल्याण बोराडे आदींनीही समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले.
आढावा बैठकीच्या आधी रमेश चेन्नीथला व नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सरकार विधानसभेची निवडणूक एक महिना पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली. सरकारची लाडकी बहीण योजना ही लाडकी खुर्ची असल्याची व हे सरकार शेतकरी, शेतमजूर, युवक व महिला विरोधी असल्याची टीका केली. लाडक्या बहिणींची एवढी काळजी होती तर मग ही योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर का आणली? अजित पवार म्हणतात, तुम्ही जर महायुतीचं बटण नाही दाबलं तर योजना बंद होईल, असा इशारा देतात. यातच या योजनेचा उद्देश दडलेला नाही का? असे सवाल पटोले यांनी उपस्थित केला. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारचे वर्णन लुटारू, डाकू सरकार असे करत राज ठाकरे हे कन्फ्यूज्ड नेते असल्याची टीका केली.